Solapur, 14 November : सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार होते. मागच्या 10 वर्षांपासून मोदी प्रधानमंत्री आहेत. मात्र, इथली पाण्याची समस्या भाजप सोडवू शकलेला नाही. येत्या 20 तारखेला भाजपला पाणी पाजा; आमचा आमदार (फारूक शाब्दी) तुम्हाला आठवड्यात 4 वेळा पाणी देईल, असा हल्लाबोल एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर केला.
एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांची पक्षाचे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील उमेदवार फारूक शाब्दी यांच्या प्रचारार्थ शहरात सभा झाली. त्या सभेत ओवैसी बोलत होते. ते म्हणाले, येत्या 20 तारखेला तुम्ही फारुक शाब्दीला आमदार केलं तर सोलापुराची जनता जी विकासापासून वंचित आहे, बेरोगार तरुणांना रोजगार नाही, सोलापुरात आठ दिवसाड पाणी भेटतं, या सर्व समस्यांचे निराकरण फारूक शाब्दी करतील.
सोलापुरात दोन देशमुख असल्यामुळे उड्डणणपुलाचं काम होऊ शकलं नाही. नरेंद्र मोदी यांनी 2014 ला भारतीय आर्मीचे कपडे सोलापुरातून शिवले जातील, असं सांगितलं होतं. मात्र, त्यांनी ते काम पूर्ण का नाही केलं. सोलापूर स्मार्ट सिटी हा भ्रष्टाचारचा अड्डा बनला आहे. स्मार्ट सिटीचे काम करण्यासाठी आमदारही स्मार्ट असला पाहिजे. इकडे जे आमदार होते, ते फक्त स्वतः चे खिशे भरण्यासाठी स्मार्ट होते, अशा शब्दांत भाजप आमदारांचा ओवैसी यांनी समाचार घेतला.
एका शिवसेनेपासून दोन शिवसेना बनल्या, त्यामुळे दोघांना नोकऱ्या मिळाल्या. एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादीच्या बनल्या, त्यामुळे काका आणि पुतण्या दोघांनाही नोकऱ्या मिळाल्या. त्यात काँग्रेस आता म्हातारी झाली आहे, अशी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी सर्व पक्षांवर केली.
लाडक्या बहिणीसाठी 1500 रुपये देणार, असं महायुती म्हणत आहेत आणि आघाडीवाले म्हणतायत आम्हीही देऊ. मात्र आज तांदूळ 80 रुपये किलो, गहू 50 रुपये किलो आहे. नरेंद्र मोदी चहा बनवून प्रधानमंत्री बनले मात्र ती साखर 30 रुपये किलो होती ती आज 45 रुपये किलो बनली आहे. म्हणजेच मोदी आणि शाह म्हणतात की लाडकी बहीण आमच्यासोबत आहेत. मात्र, तुम्ही 1500 रुपये देऊन 1900 रुपये काढत आहेत, असा आरोपही ओवैसी यांनी राज्य सरकारवर केला.
ते म्हणाले, अरे हे दिलं ते दिलं म्हणत आहेत, अरे तुमच्या बापचं देताय का..? हे जनतेचेच पैसे आहेत. तुम्ही हिंदू-मुस्लिम लढाई बघणार की महागाईकडे बघून मतदान करणार..? ज्यांनी मागच्या 10 वर्षांत प्यायला पाणी नाही दिल, त्यांना येत्या 20 तारखेला पाणी पाजणार ना..? शिवसेना भाजप आणि काँग्रेसला तुम्ही सत्ता दिली. मात्र त्या सर्वांनी सोलापूरची वाट लावली
सोलापूरच्या चादरीबाबत मोदींनी ‘मन की बात’ मध्ये बोलले नाहीत. मोदी आरक्षणावर बोलतायत. इथं महागाई मोठ्या प्रमाणात आहे. मोदी, मराठ्यांना आरक्षण द्यायचं वचन तुम्ही दिल होतं, मनोज जरांगे पाटलांनी तुमची झोप उडवली आहे. मी मराठा समाजाला सलाम करतो; कारण त्यांनी जरांगे पाटलांना आपला नेता माणलं आहे.
मराठा आरक्षण तुम्हाला द्यायलाच लागणार आहे. एमआयएमचा उमेदवार जेव्हा विधानसभेत जाईल, तेव्हा मराठा आरक्षणासाठी विधानसभेत लढेल, असा शब्द ओवैसी यांनी सोलापूरच्या मराठ्यांना दिले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.