Rankala Lake Development | Kolhapur Civic Spending Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rankala development : प्रशासक काळात एकट्या रंकाळ्यावर 22 कोटींचा चुराडा; लोकप्रतिनिधींच्या हृदयातलं काम संशयाच्या भोवऱ्यात

Kolhapur Rankala development : गेल्या पाच वर्षात रंकाळ्यावर कोट्यावधी निधीची उधळण झाली असली तरी रंकाळ्याचे मूळ दुखणं जैसे थे आहे. रंकाळ्यातील पाणी प्रदूषण, त्यातून उत्पन्न होणारा जलचारांच्या जीवांना धोका, परदेशी पक्षांनी फिरवलेली पाठ, रंकाळ्याच्या सभोवताली पार्किंगची समस्या ही कायम आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 03 Sep : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक कार्यकाळात एकट्या रंकाळ्यावर तब्बल 22 कोटींचा चुरडा करण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधीच्या हृदयातलं काम संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. रंकाळा चौपाटी परिसर व रंकाळा संवर्धनासाठी गेल्या पाच वर्षात कोट्यावधींची विकास कामे झाली आहेत.

कोल्हापूर महापालिकेचा प्रशासक कार्यकाळ हा 2020 पासून ते फेब्रुवारी 2026 पर्यंत होता. या काळात रंकाळा सुशोभीकरण, देखभाल दुरूस्ती, सौंदर्यकरण अशा विविध विकासकामांवर 21 कोटी 40 लाख 50 हजार 460 रुपये खर्च करण्यात आला आहे. तर अद्याप चार कोटींची कामे बाकी आहेत. गेल्या पाच वर्षात केवळ कागदोपत्री डोंगराएवढा विकास रंकाळ्याचा झाला आहे. मात्र रंकाळ्याचे मूळ प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत.

कोल्हापूर शहरातील अनेक प्रश्न गंभीर बनत चालले आहेत. रस्त्यांची अवस्था दयनीय बनली असून अजूनही मूलभूत सुविधांची वानवा आहे. अशा परिस्थितीत एकट्या रंकाळ्यावर कोट्यावधींचा निधी महापालिकेच्या तिजोरीतून, पर्यटन योजनेच्या अनुदानातून करण्यात आलेला आहे. प्रशासक काळात राज्य सरकारकडून थेट अनुदान किंवा योजनेचा लाभ महापालिकेला मिळतो. सभागृह अस्तित्वात नसल्याने प्रशासक त्यावर निर्णय घेत असतात. शिवाय या काळात महापालिकेतील तिजोरीच्या खर्चावर प्रशासकांचे नियंत्रण असते. 2021 ते मार्च 2026 या आर्थिक वर्षात हा भरमसाठ निधी एकट्या रंकाळ्यावर खर्च केलेला आहे.

2021 ते 2022 या आर्थिक वर्षात तत्कालीन प्रभाग क्रमांक 11 मधील शाहू स्मृती उद्यान विकसित करण्यात आले होते. त्यावर स्वनिधीतून 6 लाख 97 हजार 879 इतका निधी खर्च करण्यात आला. केंद्र शासन पुरस्कृत नागरी वनीकरण हरित पट्टे विकसित करणे या अंतर्गत शाहू स्मृती उद्यानात अनुदानातून 22 लाख 34 हजार 835 रुपयांचे काम करण्यात आले. 2022 ते 2023 या आर्थिक वर्षात स्वनिधीतून विभागीय कार्यालय एक अंतर्गत रंकाळा तलाव परिसरातील टॉवर उद्यान, पदपथ उद्यान, व शाहू स्मृती उद्यानातील लहान मुलांची खेळणी दुरुस्त करणे यावर दोन लाख 27 हजार 626 रुपयांचे काम करण्यात आले. तर रंकाळा संवर्धन आणि विविध विकास कामासंदर्भात अनुदान मार्फत तब्बल नऊ कोटी 83 लाख 99 हजार 257 रुपयांची विकास कामे करण्यात आली.

2023 ते 24 या आर्थिक वर्षात रंकाळा पदपथ उद्यान येथे उर्वरित पाथवे करण्यासंदर्भात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान जिल्हास्तर योजनेअंतर्गत पुन्हा महापालिकेच्या तिजोरीतून 26 लाख 73 हजार 938 रुपयांची कामे करण्यात आली. तसेच प्रादेशिक पर्यटन योजना अंतर्गत रंकाळा तलाव परिसर विकास योजनेतून रंकाळा तलाव स्वभवतालच्या नादुरुस्त झालेल्या लहान दगडी भिंतीची दुरुस्ती करण्यावर दोन कोटी 56 लाख 54 हजार 999 रुपये खर्च करण्यात आले . तर नागरी दलित वस्ती सुधारणा अनुदानातून आणि महापालिकेच्या स्वनिधीतून मिनीएचर पार्क उभारण्यासाठी बारा कोटी 81 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यातील आत्तापर्यंत दोन कोटी 35 लाख 59 हजार 199 रुपयांची कामे झाली आहेत.

सध्या रंकाळा तलाव येथे नागरी दलित वस्ती सुधारणा, महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत रंकाळ्यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई, ध्वनी प्रणालीसह पाण्याचे कारंजे बसवणे हे काम दोन टप्प्यात करण्यासाठी तब्बल आठ कोटी 30 लाख 94 हजार 228 इतके अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यासाठी आत्तापर्यंत पाच कोटी 76 लाख 727 इतक्या रुपयांची कामे झालेली आहेत.

मंजूर एकासाठी कामे दुसरे

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी 2021 ते 22 या वर्षात अनुदानातून दहा कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत. यामध्ये रंकाळ्याचे संवर्धन आणि विविध विकास कामांवर 9 कोटी 83 लाख 99 हजार 257 रुपयांची कामे करण्यात आली. या कामांतर्गत चार ठिकाणी शौचालय बांधण्याचा प्रस्ताव मंजूर होता. मात्र त्यातून जुना वाशी नाका ते शाहू स्मृती उद्यान येथील पद पथ करता काँक्रीट ऐवजी दगडी फरशी बसवण्यात आली. शिवाय सहा झाडां भोवती दगडी पार बांधले. या निधीतील या कामावर 97 लाख 10 हजार 492 रुपये इतका निधी खर्च झाला.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात दहा लाख 99 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला होता मात्र हे काम झाले नाही. हा निधी इतर ज्यादा कामांसाठी खर्च करण्यात आला. यामध्ये शाहू स्मृती उद्यान येथील वीट बांधकामातील पिलर काढून त्या ऐवजी दगडातील घडीव पिलर चे बांधकाम करण्यात आले. त्यासाठी 34 लाख 98 हजार 559 रुपये निधी खर्च झाला. दुचाकी व चार चाकी पार्किंग व्यवस्था करण्यासंदर्भात 69 लाख 25 हजार 967 इतकी रक्कम मंजूर करण्यात आली. त्यातून परताळ्या मधील वर्षानुवर्षे साठलेला भराव काढून टाकण्यात आला त्यासाठी 34 लाख 54 हजार 466 रुपये इतका निधी खर्च करण्यात आला.

रंकाळ्याचं मूळ दुखणं जैसे थे!

गेल्या पाच वर्षात रंकाळ्यावर कोट्यावधी निधीची उधळण झाली असली तरी रंकाळ्याचे मूळ दुखणं जैसे थे आहे. रंकाळ्यातील पाणी प्रदूषण, त्यातून उत्पन्न होणारा जलचारांच्या जीवांना धोका, परदेशी पक्षांनी फिरवलेली पाठ, रंकाळ्याच्या सभोवताली पार्किंगची समस्या ही कायम आहे.

राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या तिजोरीतून कोट्यावधीचा निधी रंकाळ्यासाठी आला. पण तो निधी कुठे मुरत आहे. याची माहिती प्रशासन पत्रव्यवहार करून देखील देत नाही. केवळ रंकाळ्याच्या सौंदर्यांवर कोट्यावधीचा निधी खर्च होतोय का? त्यातून लोकप्रतिनिधीचा विकास होतोय? हे जनतेसमोर येण्यासाठी रंकाळ्यावर विविध कामासंदर्भातील खर्चाचा तपशील देणारा फलक लावावा. शिवाय या कामांची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी रंकाळा संवर्धन संरक्षण समितीचे राजेंद्र इनामदार यांनी सरकारनामाशी बोलताना केली.

कोल्हापूर शहराचे सौंदर्य रंकाळा आहे. मात्र गेल्या पाच वर्षाच्या प्रशासक काळात रंकाळा संवर्धनाच्या नावाखाली 25 कोटींचा निधी खर्च झाला आहे. त्यातून दुसरा रंकाळा तयार झाला असता. अनेक कामे दर्जाहीन झाली आहेत. रंकाळ्याचं दुखणं कायम असून तो मरण यातना सोसतोय. झालेल्या कामांची प्रशासनाने खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते राजेश लाटकर यांनी सरकारनामाशी बोलताना केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT