NCP office bearers Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का; एकाच दिवशी १८ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा; शिंदे गटात सामील

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोजगार आणि स्वयंरोजगार सेलचे शहराध्यक्ष सागर शितोळे यांच्यासह इतर १८ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर (Solapur) महापालिकेची सत्ता ताब्यात घेऊ पाहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) आज (ता. २० ऑगस्ट) मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या तब्बल १८ पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादीतील सर्व पदांचा व पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटात प्रवेश केला आहे. (Resignation of 18 party office bearers of NCP in Solapur; joins Eknath Shinde's group)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापुरातील १८ पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे. त्या सर्वांनी आता मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोजगार आणि स्वयंरोजगार सेलचे शहराध्यक्ष सागर शितोळे यांच्यासह इतर १८ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सोलापुरातील नेते मनीष काळजे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोजगार आणि स्वयंरोजगार सेलच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या वेळी नव्याने शिंदे गटात दाखल झालेले सागर शितोळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्यासह अठरा पदाधिकाऱ्यांनी रामराम ठोकल्याचे जाहीर केले.

मी आणि माझे सर्व सहकारी गेल्या आठ ते दहा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत होतो. ज्या विरोधात होतो, त्यावेळी आंदोलन मोर्चे करण्यासाठी आम्ही पुढे होतो. पण, सत्ता आल्यानंतर पालकमंत्री बाहेरचा नेमण्यात आला. त्यांचे नाव मामा असल्याने अनेक भाचे मलिदा खाण्यासाठी पक्षात आले. पक्ष विरोधात असताना ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष जगवला त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कोणत्याही कमिट्या नेमण्यात आलेल्या नाहीत. क्षमता असणाऱ्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून कायम डावलण्यात आलेले आहे. महापालिकेच्या विरोधात कोणतेही आंदोलन पक्षाकडून करण्यात आलेले नाही. म्हणजे तुमची कुठेतरी ॲडजेस्टमेंट हेाती का, असा सवालही सागर शितोळे यांनी यावेळी पक्षाला विचारला.

शिंदे गटात सर्वसामान्यांना न्याय मिळेल. राष्ट्रवादीतून आलेल्या कार्यकर्त्यांनी योग्य ठिकाणी संधी देण्यात येईल. आधीच्या पक्षात जो यांच्यावर अन्याय झाला, तो आमच्याकडे होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी माझी असेल, असे शिंदे गटाचे सोलापुरातील मनीष काळजे यांनी शितोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशानंतर बोलताना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT