Solapur, 02 October : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत ठरावावर हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. हरकतींच्या मुद्यावरून भारतीय जनता पक्षातील अंतर्गत वाद डीसीसी बॅंकेच्या निवडणुकीतही उफाळून आल्याचे दिसून येत आहे. कारण, दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या १४ सोसायट्यांच्या ठरावावर खुद्द भाजप कार्यकर्त्यांकडूनच हरकती घेण्यात आल्याची माहिती आहे. संबंधित गावचा रहिवासी नसतानाही काही ठराव झाले आहेत. ती व्यक्ती सोसायटीचा सभासद, कर्जदार नसणे, संबंधित गावात त्याची शेतजमीन नाही, अशा हरकती घेण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे कर्नाटकातील एका व्यक्तीचा सोलापूर डीसीसी बॅंकेच्या निवडणुकीसाठी दक्षिण सोलापूरमधील औज (मं) येथे ठराव झाल्याचे पुढे आले आहे, त्यामुळे या गंभीर आक्षेपावर काय निर्णय होतो, याकडे सोलापूरचे लक्ष लागले आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बॅंकेसाठी २१६५ ठराव झाले असून त्यावर हरकती घेण्यात आल्या आहेत. त्या हरकतीच्या मुद्यावरून भाजपमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातून माजी संचालक सुरेश हसापुरे समर्थकांचे बॅंकेसाठी मोठ्या प्रमाणात ठराव झाले आहेत. त्यांना अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे पाठबळ आहे. मात्र, दक्षिणमधील तब्बल १४ ठरावांवर हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश हरकती या संबंधित व्यक्ती गावाचा रहिवासी नसणे, सोसायटीचा सभासद आणि कर्जदार नसणे, अशा स्वरुपाच्या आहेत.
दक्षिण सोलापूरमधील भाजपच्या बड्या नेत्यांच्या समर्थकांनीच पुणे विभागीय सहनिबंधकांकडे या तक्रारी दाखल केल्याने सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या माध्यमातून संचालक होण्यासाठी इच्छुकांकडून निशाणा साधण्यात आला आहे.
आक्षेप घेण्यात आलेली नावे....... रहिवासी गाव .... ठराव झालेली सोसायटी
१) रमेश गोविंद पाटील..............भंडारकवठे........खानापूर सोसायटी (रहिवासी नाहीत)
२) रेवणसिद्ध हिंगमिरे...............विंचूर...............अंत्रोळी सोसायटी
३) उज्ज्वल रामपुरे...................कुंभारी...............तोगराळी सोसायटी
४)प्रदीप श्रीमंत खुने (सचिव)........निंबर्गी................बोरूळ सोसायटी
५) सुनीता प्रदीप खुने................निंबर्गी................चिंचपूर सोसायटी
६) श्रीदीप सुरेश हसापुरे..............निंबर्गी...............बोळकवठे सोसायटी
७) सुरेश हसापुरे.....................सोलापूर...............होटगी स्टेशन सोसायटी
८) सुदर्शन सुरेश हसापुरे.............सोलापूर......... .तिल्हेहाळ सोसायटी (शेतजमीन, रहिवासी नाहीत)
९) आमसिध बिराजदार...............विंचूर.................शंकरनगर सोसायटी
१०) महेश विभूते.....................कंदलगाव .............हिपळे सोसायटी
११) द्राक्षयाणी तम्मराया बिराजदार....सोलापूर..............बसवनगर सोसायटी
१२) कस्तुराबाई जोकारे................कंदलगाव ............सादेपूर सोसायटी
१३) नागनाथ चडचणे (सचिव)........बंकलगी..............सिंदखेड सोसायटी
१४) दादागौड जगदेव बिराजदार .......कर्नाटक...............औज (मं) सोसायटी
यातील दादागौडा बिराजदार हे कर्नाटकातील रहिवासी असून त्यांचा औज सोसायटीत ठराव झाला आहे. त्यांचा औज सोसायटीशी कोणताही संबंध नसल्याची हरकत नोंदविण्यात आली आहे. या हरकती भाजपशी संबंध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नोंदविल्याचे पुढे आले आहे. याच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी संबंधित नेत्यांनी भाजपच्या महाराष्ट्रातील सर्वांत पॉवरफुल नेत्याची भेट घेतल्याचीही चर्चा आहे. मात्र, त्यावर काय चर्चा झाली आणि तोडगा निघाला आहे की नाही, याची माहिती मिळू शकली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.