

Satara, 01 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक वरिष्ठ नेतृत्वाच्या सूचनेनुसार महायुती एकत्रितपणे लढणार आहे. जागावाटपाचा तिढा अजून कायम असला तरी महायुतीची निवडणूक जिंकण्याची स्ट्रॅटेजी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उघड केला आहे. त्यानुसार ‘सोसायटी मतदारसंघातील ११ जागा प्रत्येकाने स्वतःच्या ताकदीवर लढायच्या आहेत. पण आरक्षित १० जागांवर सन्मानजनक तोडग्याची अपेक्षा आहे,’ असे सांगून या १० जागांवर महायुतीमध्ये रस्सीखेच होणार हे निश्चित आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज शेवटच्या दिवशी सातारा विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शिवेंद्रराजेंनी निवडणूक रणनीतीवर भाष्य केले.
ते म्हणाले जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत विकास सेवा सहकारी सोसाट्यांच्या जागा हा वेगळा मुद्दा आहे. तडजोड किंवा वाटप हे आरक्षित जागांचे होणार आहे. सोसायटी मतदारसंघातील ११ जागा ह्या ज्याने त्याने आपापल्या ताकदीवर लढायच्या आहेत. या मतदारसंघासाठी पॅनेल किंवा पक्ष हा विषय येत नाही. पूर्वीही कधी नव्हता. त्यामुळे या सहकारी सोसायटीच्या जागा ज्याने त्याने आपल्या ताकदीवर लढायच्या आहेत.
बॅंकेच्या उर्वरीत ज्या आरक्षित १० जागा आहेत, त्यात खासदार उदयनराजे भोसले यांचीही एक जागा आहे. त्यामुळे या १० जागांमध्ये सन्मानजनक तोडगा निघावा, अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. आम्ही (भाजप) ७ जागा मागितलेल्या नाहीत, असेही मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बॅंकेच्या सहकारी सोसायटी मतदारसंघातील ११ जागा ह्या त्या त्या तालुक्यातील महायुतीच्या नेत्यांनी आपापल्या ताकदीवर लढायच्या हे निश्चित आहे. मात्र, उर्वरीत नागरी बँका आणि पतसंस्था मतदारसंघ : १ जागा, खरेदी-विक्री संघ मतदारसंघ : १ जागा, कृषी प्रक्रिया संस्था मतदारसंघ: १ जागा, औद्योगिक, विणकर व मजूर संस्था मतदारसंघ: १ जागा, गृहनिर्माण आणि दूध संस्था मतदारसंघ: १ जागा, महिला राखीव मतदारसंघ: २ जागा, इतर मागासवर्गीय मतदारसंघ: १ जागा, अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) मतदारसंघ: १ जागा, भटक्या जमाती व विमुक्त जाती (VJNT) मतदारसंघ: १ जागा या एकूण १० जागांबाबतच महायुतीमध्ये वाटपाची बोलणी होणार, हे निश्चित आहे. त्यावर निवडणुकीतील महायुतीचे भवितव्य अवलंबून आहे.
जागा वाटप जसं होईल, त्याप्रमाणे संबंधितांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माघार घ्यावी, याची जबाबदारी पार पाडावी. मी, जयकुमार गोरे, मकरंदआबा पाटील, शंभूराज देसाई हे कॅबिनेट मिटिंगमुळे मुंबईतच होतो, त्यामुळे भाजप ११ आणि शिवसेना-राष्ट्रवादी १० असा जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला अजून निश्चित झालेला नाही, असेही शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.