Karjat Jamkhed News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे गुरुवारी जवळपास नऊ कोटींच्या कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार रोहित पवार यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. या वेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ हे केवळ राज्यातलं नव्हे, तर देशातलं प्रेरणास्थान आहे. मात्र, या ठिकाणी अनेक वर्षे लोकप्रतिनिधित्व करणाऱ्या आमदाराने एक पैशाचा निधीही चौंडीच्या विकासासाठी आणला नाही. आम्ही विकासाचे राजकारण करतो. मात्र, प्रत्येक कामात अडथळे आणण्याचं काम आमचे विरोधक या ठिकाणी दिवस-रात्र करत असल्याचा घणाघात रोहित पवार यांनी केला.
चौंडीचा विकास हा केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असताना झालेला आहे. त्यानंतर 2019 ला महाविकास आघाडी सरकारने चौंडीसाठी भरीव निधी दिला. काँग्रेस राष्ट्रवादी काळातच जवळपास 30 कोटींच्या निधीतून विविध विकासकामे या ठिकाणी झाली. त्यानंतर 2019 ला मविआ सरकार असताना आम्ही अनेक कामांना मोठा निधी घोषित करत त्याला मंजुरी दिली होती. मात्र, दुर्दैवानं सरकार बदललं आणि इथल्या लोकप्रतिनिधीने ही कामे पूर्ण करण्याऐवजी त्या कामांना स्थगिती देण्याचा एकमेव उद्योग केल्याचा आरोप रोहित पवार यांनी आपल्या भाषणात केला.
चौंडीमध्ये जवळपास आज नऊ कोटींच्या कामांचा भूमिपूजन सोहळा खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री अनिल देशमुख, काँग्रेसचे आमदार सत्यजित कदम, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, त्याचबरोबर सक्षणा सलगर आदींच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यानंतर झालेल्या कार्यक्रमात सर्वच वक्त्यांनी भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहे. तत्पूर्वी होणाऱ्या 9 कोटींच्या विकासकामांबाबत बोलताना रोहित पवार यांनी राम शिंदे यांचं नाव न घेता, त्यांना या ठिकाणी विकास नकोय. आम्ही विकास करतो तर त्यात अडथळे आणले जातात. मंजूर कामांना स्थगिती आणली जाते. शेवटी आम्हाला न्यायालयाचा आधार घेऊन कामांवरील स्थगिती उठवून कामे पूर्ण सुरू करावी लागत आहेत.
त्यांना फक्त मते, राजकारण, सत्ता एवढेच हवे आहे. समाजामध्ये वाद कसा होईल याची ते काळजी घेतात. धार्मिक कामांचीही अडवणूक करणे हे कितपत योग्य, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. आपल्या कार्यकाळात आपण जवळपास साडेचारशे ते पाचशे कोटींचा निधी कर्जत जामखेड मतदारसंघासाठी आणला असल्याचा दावा या वेळी रोहित पवार यांनी केला.