चौंडी येथे आमदार रोहित पवार यांनी आणलेल्या नऊ कोटींच्या निधीमधील विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने माजी गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते आणि त्या अनुषंगाने अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणांमध्ये अनिल देशमुख यांचा राजीनामा केवळ ऐकीव माहितीवर घेतला आणि त्यांनी तो नैतिकता पाळत दिला, असा संदर्भ आपापल्या भाषणात दिला. आरोप करणारे परमवीर यांनीही ऐकीव माहितीवर आरोप केल्याचं कबूल केले. मात्र, आता मी रोज देवेंद्रभाऊंच्या विरोधात पुरावे देतेय. मात्र, ते काही राजीनामा देण्याची भाषा बोलत नाहीत. असा आपल्या नेहमीच्या आक्रमक आणि मार्मिक पद्धतीने शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना घेरलं आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख विविध कारणांनी चर्चेत आले. त्यात त्यांच्यावर शंभर कोटी रुपये मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला होता. मात्र, तो न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही आणि परमवीर यांनी आपण हा ऐकीव माहितीवर केल्याचे सांगितलं. आता हाच मुद्दा पकडून सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना घेण्यात घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
सध्या मी देवेंद्रभाऊंना रोज पुराव्यावर पुरावे पाठवत आहे. राज्यातील कायदा व्यवस्था पूर्ण बिघडली आहे. ड्रग्जचे मोठं रॅकेट राज्यात कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न अंधारे यांनी या वेळी उपस्थित केला. महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम कोण करतंय, असे प्रश्न करत याबाबतचे अनेक पुरावे मी देवेंद्रभाऊंना रोज पाठवत आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. मात्र, देवेंद्रभाऊ यावर एक शब्द सध्या बोलायला तयार नाहीत, अशी मार्मिक टिप्पणी सुषमा अंधारे यांनी या वेळी केली.