Rohit Pawar, Ram Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Kharda Divide : नगर राहिले बाजूला, खर्डा गावाच्या विभाजनाचा विषय उफाळला !

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : राज्यातील सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचे प्रशासकीय आणि नागरीदृष्टीने विभाजन व्हावे ही फार जुनी मागणी आहे. आता जिल्हा राहिला बाजूला मात्र जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतीच्याच विभाजनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खर्ड्याची ग्रामसभा, मासिक सभांमधून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यानंतर विरोधी ग्रामपंचायत सदस्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे शिवपट्टण विकास युवा मंच आता अक्रमक झाला आहे. विरोधकांच्या भूमिकेला प्रतिउत्तर देण्यासाठी रविवारी (ता. २३) खर्डा शहर कडकडीत बंद ठेवले होते. या विषयावर आजची सोमवारी (ता. २४) विशेष ग्रामसभाही वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. (Latest Political News)

जामखेड तालुक्यातील खर्डा गाव हे मोठ्या लोकवस्ती आणि बाजारपेठेचे गाव आहे. राजकीय दृष्टीने कर्जत-जामखेड मतदारसंघात खर्डा गावाला विशेष महत्व आहे. खर्डा ग्रामपंचायत गावासह पाच वाड्यांच्या लोकवस्तीची ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रमपंचायतीच्या एकूण १७ पैकी ११ सदस्य खर्डा तर सहा सदस्य पाच वाड्यांमधून निवडले जातात. यामुळे विकासकामे होताना अनेक तक्रारी गाव आणि वाड्यांमधून असल्याने खर्डा ग्रामपंचायत विभाजनाची मागणी जोर धरू लागली आहे.

खर्डा येथे झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायत विभाजनाच्या ठरावाला पाठिंबा देऊन सत्तेतील (आमदार राम शिंदेच्या गटातील) सदस्यांनी भूमिका बदलली. त्यांनी ग्रामपंचायत विभाजनाला कारणे देत विषय प्रलंबित केल्याच्या निषेधार्थ रविवारी खर्डा शहर बंद पुकारण्यात आला होते. दरम्यान, दि. १२ जुलै रोजी खर्डा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत एकूण १७ ग्रामपंचायत सदस्यांपैकी १४ ग्रामपंचायत सदस्यांनी ठरावाला पाठिंबा दिला होता.

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत २१ जुलै रोजी आमदार राम शिंदे गटातील ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणुकीच्या एक वर्षाअगोदर खर्डा ग्रामपंचायत विभाजनाचा निर्णय घेण्याचा विषय मांडला. त्याला आठ ग्रामपंचायत सदस्यांनी (आमदार रोहित पवार गट) विरोध केला होता. या ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे खर्डा ग्रामपंचायत विभाजनाचा ठराव मासिक बैठकीत करावा अशी मागणी केली. सत्ताधारी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी अचानक भूमिका बदलल्याच्या कारणामुळे खर्डा शहर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा निषेध म्हणून रविवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे सोमवारी होणाऱ्या ग्रामसभेकडे तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार लोकप्रतिनिधीत्व करत आहेत, तर भाजपचे माजीमंत्री आणि विधानपरिषद आमदार शिंदे हे मतदारसंघात कार्यरत आहेत. मतदारसंघात दोन आमदार असताना विकासावर चर्चा होण्याऐवजी श्रेयवाद आणि जिरवा-जिरवीवरच अधिक चर्चा झडत आहेत. त्यामुळे मतदारसंघासाठी 'एमआयडीसी' मंजुरी, राष्ट्रिय बँकांच्या शाखांना मंजुरी, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पादुका विषय असो की आता उफाळून पुढे येत असलेला खर्डा ग्रामपंचायत विभाजनाचा विषय याकडे मतदारसंघाच्या कारभाऱ्यांनी राजकारणाऐवजी लोकभावना लक्षात घेऊन समाजकारण करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT