Solapur, 07 March : काँग्रेस पक्षाच्या मुशीत घडलेले आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या सचिन चव्हाण यांची शिवसेनेच्या सोलापूर शहरप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे शिवसेनेसह सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण, चव्हाण यांनी शिवसेनेत प्रवेश करताच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून सोलापूरमधून (Solapur) माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार रतिकांत पाटील, दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविलेले अमर पाटील यांनी गुरुवारी (ता. 06 मार्च) एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षात असणारे सचिन चव्हाण यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेना (Shivsena) प्रवेशानंतर सचिन चव्हाण यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने सोलापूरच्या शहरप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. भारतीय जनता पक्षातून शिवसेनेत आलेल्या नेत्यावर थेट शहरप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये कोणाचा हात आहे, अशी चर्चा सोलापूरमध्ये रंगली आहे.
दरम्यान, सचिन चव्हाण यांचे आजोबा चंद्राम चव्हाण गुरुजी हे काँग्रेसचे मुरब्बी नेते होते. सोलापूर शहरात ते चंद्राम गुरुजी नावाने परिचित होते, त्यामुळे सचिन चव्हाण हे काँग्रेसच्या संस्कृतीत वाढलेले नेते आहेत. मात्र, मागील 2017 च्या निवडणुकीत सचिन चव्हाण यांच्या बहिणीने भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली होती. तेव्हापासून सचिन चव्हाण हे भाजपसोबत होते.
भारतीय जनता पक्षात सचिन चव्हाण यांची माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांचे देशमुख यांच्यासोबतचे संबंध बिघडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ते माजी मंत्री देशमुख यांच्यापासून लांब गेल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, चव्हाण हे गेल्या सहा महिन्यांपासून शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, त्यामुळेच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविल्याचे सांगितले जात आहे. सचिन चव्हाण यांचे सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात नाव आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.