Sangli, 17 May : जत पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कामाबद्दल त्यांचे तोंडभरून कौतुक केले. विशेष म्हणजे कौतुक करत असताना खोतांनी आजच्या काळातील मल्हारराव होळकर म्हणून गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख केला. त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सदाभाऊ खोत (Sadabhau Khot ) म्हणाले, गोपीचंद पडळकर हे माझे सहकारी आमदार असेल तरी कामाला बाप माणूस आहे. तसा तो हुशार माणूस असल्यामुळे कुठं काय करावं आणि काय नाही, हे त्याला कळतं. जत तालुक्याला देवभूमी म्हणून घोषणा केली, ती घोषणा जयकुमार गोरेंना करायला लावली. का करायला लावली तर देवस्थानला फंड ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेच देऊ शकतात, हे त्यांनी ओळखलं आणि त्यांना पकडलं आणि जतला देवभूमीची घोषणा करायला लावली. तालुक्यातील ३५ मंदिरांचा विकास करण्याची जबाबदारी आता गोरे यांची आहे. आम्ही मागितलं आणि गोरे यांनी दिलं नाही, असं कधीच झालं नाही.
गोपीचंद पडळकर आपल्या सर्वांचा लाडका कार्यकर्ता आहे. त्यांनी पाटबंधारे, नगरविकास, बांधकाम विभागाचा निधी खेचून आणला. शंभर वर्षांत जत तालुक्याचा जेवढा विकास झाला नाही, तेवढा दीड वर्षांत गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar ) यांनी केला आहे. नगरपालिका, जत पंचायत समिती आणली, तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून आणले, असेही खोत यांनी नमूद केले.
ते म्हणाले, मी तर म्हणतो, आजच्या काळातील सरसेनापती मल्हारराव होळकर कोण असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे. मी असं म्हटल्यामुळे काही गडी उद्यापासून माझ्यावर टीका करायला लागतील. पण आम्हाला माहिती आहे, कुठं बटण दाबायचे आहे, ते आम्ही बरोबर दाबतो.
दुष्काळी भागातून पुढे आलेले जयकुमार गोरे यांचे नेतृत्व आहे. सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवला. ताठ बाना आणि ताठ मान असलेले हे नेते आहेत, असेही सदाभाऊ खोत यांनी नमूद केले.
गोरे किंवा पडळकर यांनी एखादा वार केला तर प्रस्थापितांना ते बरं वाटत नाही. ते आमच्या बरोबरीचे नाहीत, पण प्रस्थापितांना सांगतो की, हे तुमच्या बरोबरीचे नव्हे तर तुमच्या छताडावर पाय देऊन देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहेत, असेही सदाभाऊ खोतांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.