

Karad, 17 May : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी महायुतीतील अंतर्गत संघर्षाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली होती. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय संघर्ष एवढा टोकाला गेला होता की, त्याचे पडसाद थेट विधीमंडळापर्यंत उमटले. झेडपीतील सत्तासंघर्ष, सदस्यांची फोडाफोड, पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीचे आरोप आणि मंत्र्यांमधील उघड नाराजी यामुळे सातारा जिल्ह्यातील महायुतीतील समन्वय पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांविषयी जाहीरपणे सौम्य भूमिका घेतल्याने राजकीय शीतयुद्धावर तात्पुरता तरी पडदा पडल्याचे मानले जात आहे.
सातारा जिल्हा परिषद (Satara Zilla parishad) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक राहिली नव्हती, तर ती महायुतीतील अंतर्गत ताकद आजमावण्याची राजकीय रणभूमी ठरली होती. भाजपकडे स्पष्ट बहुमत नसताना अखेरच्या क्षणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील सदस्यांना आपल्या बाजूला वळवत भाजपाने सत्ता काबीज केली. या संपूर्ण प्रक्रियेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.
सत्ता हातातून निसटल्याच्या भावनेतूनच झेडपी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आणि त्याचवेळी पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यासह काही नेत्यांनी पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप केला होता. या घटनेनंतर साताऱ्यातील महायुतीतील संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे दिसून आले.
विशेषतः पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय अंतर उघडपणे जाणवू लागले होते. दोन्ही नेते एकाच सत्तासमीकरणात असले तरी स्थानिक पातळीवर वर्चस्वाच्या राजकारणामुळे त्यांच्यातील स्पर्धा अधिक तीव्र झाली होती. त्यामुळे साताऱ्यात महायुतीत सत्तेचा समन्वय कमी आणि अंतर्गत कुरघोडी अधिक अशी स्थिती झाली होती.
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या लोकार्पण कार्यक्रमाने या राजकीय संघर्षाला वेगळे वळण दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात जयकुमार गोरे यांनी स्वतः पालकमंत्री देसाई यांना निमंत्रित करत सार्वजनिकपणे त्यांचा गौरव केला.
ते आमचे पालकमंत्री आहेत, असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी राजकीय संघर्षाऐवजी समन्वयाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यावर प्रत्युत्तर देताना शंभूराज देसाई यांनीही राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी वैयक्तिक संबंध कायम आहेत, असे म्हणत मैत्रीचा सूर लावला. पुढील कार्यक्रमासाठी पहिला फोन गोरे यांनाच करेन, असे विधान करत त्यांनीही वातावरण सौहार्दचे झाल्याचे संकेत दिले.
मंत्र्यांमधील हा केवळ सौजन्याचा भाग नसून वरिष्ठ नेतृत्वाच्या हस्तक्षेपानंतर महायुतीतील तणाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आगामी काळात कोणतीही मोठी निवडणूक नसली तरी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व आणि भविष्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेता साताऱ्यातील महायुतीतील अंतर्गत संघर्ष वरिष्ठ नेतृत्वासाठी डोकेदुखी ठरू शकतो.
सार्वजनिक मंचावर एकीचा संदेश देत महायुतीत सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. या राजकीय गोडव्यामागे स्थानिक पातळीवरील स्पर्धा पूर्णपणे संपली आहे, असे म्हणता येणार नाही. झेडपी सत्तासंघर्षात निर्माण झालेली कटुता, स्थानिक कार्यकर्त्यांमधील गटबाजी आणि सत्ता केंद्रांवरील नियंत्रणाची चढाओढ अद्याप काही प्रमाणात सुरुच आहे.
दरी बुजवण्याचा प्रयत्न
सातारा जिल्हा परिषद सत्तासंघर्षानंतर महायुतीमधील वाढलेली दरी आता बुजवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री चौहान यांच्या उपस्थितीत पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एकमेकांविषयी जाहीरपणे सौम्य भूमिका घेतली.
अचानक मैत्रीचा फॉर्म्युला कसा?
झेडपी निवडणुकीवेळी उघडपणे समोर आलेला संघर्ष, धक्काबुक्कीचे आरोप आणि महायुतीतील अंतर्गत नाराजी अजूनही कार्यकर्त्यांच्या मनातून गेलेली नसताना अचानक दिसलेला हा मैत्रीचा फॉर्म्युला वरिष्ठ नेतृत्वाच्या दबावातून आला का, याची चर्चा सुरू आहे. स्थानिक पातळीवरील वर्चस्वाची लढाई कायम असताना सार्वजनिक मंचावर दाखवलेली ही एकी आगामी राजकीय समीकरणांची नांदी ठरणार की केवळ तात्पुरता राजकीय समेट, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.