Raju Shetti, Sadabhau Khot  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sadabhau Khot Vs Raju Shetti: ...त्यांच्या अहंकारामुळे 'स्वाभिमानी'ला ग्रहण लागलंय! सदाभाऊंनी पुन्हा एकदा शेट्टींना डिवचलं

Deepak Kulkarni

Sadabhau Khot News : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर पुन्हा एकदा कात टाकत नव्या आत्मविश्वासाने विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांनी एकीकडे आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीला धडा शिकवण्याबरोबरच पक्षाबाबतही काही आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

त्यात शेट्टी यांनी पहिला धक्का हा रविकांत तुपकरांना देत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. या निर्णयातून त्यांनी संघटनेविरोधात काम करणार्‍यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.आता याच निर्णयानंतर विधान परिषदेचे आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शेट्टींना डिवचलं आहे. त्यात त्यांनी शेट्टी यांच्या अहंकारामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ग्रहण लागल्याची बोचरी टीका केली आहे.

आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मंगळवारी (ता.23)मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.त्यात राजू शेट्टींवरच्या निर्णयावरही टीकेची झोड उठवली. ते म्हणाले,शेतकरी चळवळ टिकली पाहिजे. ते शेतकऱ्यांसाठी महत्वाचं आहे.मात्र,त्यांच्या स्वत:च्या अहंकारामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सध्या ग्रहण लागलं आहे.या आत्मपरीक्षण खऱ्या अर्थाने शेट्टी यांनी करायला हवं असा हल्लाबोल खोत यांनी केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाने अजूनही विचार करावा आणि शेतकऱ्यांसाठीची ही चळवळ एकत्र कशी राहील,यासाठी प्रयत्न केला पाहिजे असा सल्लाही सदाभाऊ खोत यांनी दिला.

खोत म्हणाले, स्वाभिमानीमध्ये उल्हासदादा पाटील मी स्वत: किंवा शिवाजीराव माने,रविकांत तुपकरांसारखे यांसारख्या नेतेमंडळींची मोठी यादी आपल्याला पाहायला मिळेल.ही सर्व लोकं आपल्या घरची भाकर खाऊन, घरादारांवर तुळशीपत्र ठेऊन,बाहेर 10 ते 15 वर्षे काम करत राहिले आहे. तरीही अशा माणसांना अपमानित करणं योग्य नसल्याची टीका विधान परिषदेचे आमदार खोत यांनी केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी Raju Shetti यांच्यावर आरोप केल्यानंतर रविकांत तुपकरांबाबत निर्णय घेण्यासाठी संघटनेकडून समिती नेमली होती. या समितीकडून तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून थेट हकालपट्टी करण्यात आली. या निर्णयामुळे तुपकरांना धक्का बसला आहे.

तुपकर म्हणाले, ही गोष्ट माझ्यासाठी धक्कादायक आहे. 22 वर्षे चळवळीसाठी काम केले. लाठ्या-काठ्या खाल्ल्या. अनेकवेळा तुरुंगात गेलो. संघटना घराघरात पोचवली. आता इतके वर्षे काम केल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही वेळ येईल, असे कधी वाटले. एवढे वर्षे महाराष्ट्रात संघटना वाढवल्याचे फळ राजू शेट्टी यांनी मला दिले, अशी भावनाही तुपकरांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT