Balasaheb Patil, Manoj Ghorpade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad : एकहाती 'सह्याद्रीत' यंदा तिरंगी लढत; बाळासाहेब पाटलांचा घामटा निघणार की सत्ता राखणार?

Sahyadri Sugar Factory Election : माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आतापर्यंत एकहाती वर्चस्व राखलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यंदा तिरंगी होणार आहे.

Hrishikesh Nalagune

कराड : माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आतापर्यंत एकहाती वर्चस्व राखलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यंदा तिरंगी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर 21 जागांसाठी तीन पॅनेलमध्ये तब्बल 70 अर्ज कायम राहिले आहेत. कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज शिल्लक राहिल्याने बाळासाहेब पाटील यांचा घामटा निघताना दिसणार आहे.

जवळपास 60 हजार सभासद असलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर मागील अनेक वर्षांपासून बाळासाहेब पाटील यांची एकहाती सत्ता आहे. बहुतांश निवडणुका या बिनविरोध किंवा एकतर्फीच झाल्या. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. भाजप नेते मनोज घोरपडे यांनी त्यांना आस्मान दाखवले.

त्या दिवसापासून पाटील यांना दुसरा धक्का देण्यासाठी घोरपडेंनी बाह्या सरसावल्या. सुरुवातीला त्यांनी पाटील विरोधी गटाला एक करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील उंडाळकर, तालुक्यातील काँग्रेस नेते निवास थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य रामकृष्ण वेताळ यांना सोबत घेतले.

सर्वांशी चर्चा करत घोरपडे आघाडी पुढे नेत होते. अगदी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी त्यांनी चर्चा करायला पुढाकार घेतला. सगळ्यांची एकी दिसत असल्याने विरोधी गटही चार्ज झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल झाले. इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 252 अर्ज दाखल झाले होते. त्यातील 214 अर्ज वैध ठरले.

पण अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत घोरपडेंचा पृथ्वीराज चव्हाण, धैर्यशील कदम यांच्यासोबत समेट होऊ शकला नाही. जागा वाटपाच्या मुद्द्यांवर दोन्ही गटाची बोलणी पुढे गेली नाही. दक्षिणेतील उदयसिंह उंडाळकर मात्र आमदार घोरपडे यांच्यासोबत कायम राहिला. आता उंडाळकरांसोबत व्यूहरचना आखत यंदा काहीही करून कारखाना ताब्यात घ्यायचा असा चंग घोरपडे यांनी बांधला आहे.

त्यापाठोपाठ पृथ्वीराज चव्हाण, धैर्यशील कदम, भाजपचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य रामकृष्ण वेताळ यांनी बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात तिसरे पॅनेल उभे केले आहे. या दोन्हीही विरोधी गटांना बाळासाहेब पाटील आमदारकीला हरले तर आपण कारखान्यातही हरवू शकतो, असा आत्मविश्वास आहे.

पाटील हेही कारखान्यातील सत्ता कायम राहावी प्रयत्न करत आहे. त्यांनी प्रत्येक गटनिहाय आणि मोठ्या गावात सभासदांचे संवाद मेळावे घेऊन सह्याद्री पॅटर्नची माहिती देण्याचे काम अखंडपणे करत आहेत. यंदा ते अनेक वर्षांनंतर कारखान्याच्या निवडणुकीसाठी कराड, तळबीड, उंब्रज, वाठार किरोली, मसूर, कोपर्डे हवेली अशा सहाही गटातील गावांना पायाला भिंगरी बांधून भेटी देत आहेत.

शुक्रवारी (21 मार्च) अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी 214 पैकी तब्बल 144 उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे 21 जागांसाठी 70 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सोमवारी (24 मार्च) रोजी चिन्ह वाटप होऊन 5 एप्रिलला मतदान होणार आहे. तर 6 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या 70 जणांमधील कोण संचालक होणार हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT