Sairat actor Arbaz Shaikh's viral video triggers FDA action as the medical store attached to Solapur's Noble Hospital is sealed pending further investigation. 
पश्चिम महाराष्ट्र

Salya Video : सैराट फेम 'सल्या' वडिलांसाठी ढसाढसा रडला : व्हायरल व्हिडीओनंतर FDA चा 'नोबल हॉस्पिटलला' दणका

Sairat Salya Video : सैराट चित्रपटातील अभिनेता अरबाज शेख यांच्या व्हायरल व्हिडीओनंतर अन्न व औषध प्रशासनाने सोलापूरच्या नोबेल हॉस्पिटलच्या मेडिकलवर कारवाई करत ते सील केले असून पुढील तपास सुरू आहे.

Hrishikesh Nalagune

सैराट चित्रपटातील सल्या म्हणजे अभिनेता अरबाज शेखने सोशल मीडियावर पोस्ट केलेला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो सोलापूरमधील नोबेल हॉस्पिटल आणि संलग्न मेडिकलविरोधात तक्रार करताना, वडिलांसाठी रडताना आणि आर्थिक मदत मागताना दिसला. त्याच्या या व्हिडीओनंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने नोबेल हॉस्पिटलच्या मेडिकलविरोधात अॅक्शन घेतली आहे.

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नोबल हॉस्पिटलचे मेडिकल सील करून मेडिकलमधून औषध विक्री तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हॉस्पिटल प्रशासनाने अरबाज शेख यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचं मत म्हंटले आहे. नोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अमजदअली सय्यद यांनी हॉस्पिटलची बाजू मांडली.

अरबाज शेख किंवा कोणत्याही रुग्णाला औषधं घेण्यासाठी कोणतेही बंधन घातलेले नव्हते. अरबाज यांचे वडिलांना न्युरो संदर्भातील आजार होता, त्यामुळे त्यांना खर्चाची कल्पना दिलेली होती. मात्र त्यानंतर देखील त्याने हा व्हिडिओ का केला? याची कल्पना आम्हाला नाही. पण आम्ही कोणतीही चूक केलेली नाही, असेही डॉ. अमजदअली यांनी स्पष्ट केले.

काय होता अरबाजचा व्हिडीओ?

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातील मेडिकलमधून औषध खरेदी सक्ती करू नये असे आदेश काढले आहेत. रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना औषधे आणि वैद्यकीय साहित्य रुग्णालयाच्याच मेडिकलमधून खरेदी करण्याची सक्ती करू नये. रुग्णालयाने औषधांचे केवळ प्रिस्क्रिप्शन द्यावे. रुग्णाने किंवा त्याच्या नातेवाईकांनी कोणत्या मेडिकलमधून ती औषधे खरेदी करावीत हा त्यांचा अधिकार आहे. सक्ती करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई होईल, असा इशारा त्यांनी दिला होता.

मात्र त्यानंतरही अरबाजने व्हिडीओ करून नोबल हॉस्पिटल प्रशासनाने हॉस्पिटलमधील मेडिकलमधूनच औषध खरेदीची सक्ती केल्याचा आरोप केला आहे. "वडिलांना ब्रेन हॅमरेज झालं असून त्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला 10 हजारांचं डिपॉझिट भरल्यानंतर औषधांची लिस्ट दिली आणि ती हॉस्पिटलमधील मेडिकलमधूनच घेण्याची सक्ती केली. या औषधांचं बिल 40 हजार रुपये झाले. बाहेरून ही औषधे घेतली असती तर अर्ध्या किमतीत आली असती.

पण आता यावर आपण काय करायचे, आपल्याला आपल्या वडिलांना वाचवायचे आहे, त्यांना मरू द्यायचे नाही, पण उपचार कसे करायचे, आपण आर्थिक अडचणीत आहोत, आपल्याला मदत करा, असे आवाहन त्याने केले. त्याच्या याच व्हिडीओमधील आरोपांनंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी अरुण गोडसे यांनी नोबल हॉस्पिटलचे मेडिकल सील करून मेडिकलमधून औषध विक्री तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT