FabTake Sugar Factory Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

‘दामाजी’ची सत्ता गमावलेले समाधान आवताडे खासगी साखर कारखाना सुरू करणार

दामाजी कारखान्यातील पराभवाचा राजकीय कारकिर्दीवर परिणाम होऊ नये, यासाठी आमदार आवताडे यांनी तातडीने हालचाली करत फॅबटेक आगामी हंगामातच सुरू करण्याचा चंग बांधल्याचे दिसत आहे.

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळवेढा (Mangalveda) तालुक्यातील दामाजी सहकारी साखर कारखान्याची (Damaji Sugar Factory) सत्ता जाताच आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांनी ‘फॅबटेक शुगर’ हा कारखाना सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालवले आहेत. दामाजी कारखान्यातील पराभवाचा राजकीय कारकिर्दीवर परिणाम होऊ नये, यासाठी आमदार आवताडे यांनी तातडीने हालचाली करत फॅबटेक आगामी हंगामातच सुरू करण्याचा चंग बांधल्याचे दिसत आहे. (Samadhan Awatade, who lost power of 'Damaji', will start a private sugar factory)

दरम्यान, आर्थिक कारणांमुळे गेली दोन वर्षांपासून बंद असलेला मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथील ‘फॅबटेक शुगर’चा ताबा आता आवताडे शुगर प्रा. लि या कंपनीकडे आला आहे. तो आगामी हंगामात सुरू करण्याच्या दृष्टीने उद्योजक संजय आवताडे व त्यांच्या पत्नी सुकेशनी आवताडे यांच्या हस्ते सत्यनारायणची महापूजा करण्यात आली.

मागील महिन्यात झालेल्या दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आमदार समाधान आवताडे यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला होता. साखर कारखाना आणि आमदार हे सूत्र लक्षात घेऊन आगामी राजकारणाच्या सोयीसाठी समाधान आवताडे यांनी फॅबटेक शुगर सुरू करण्याचा निर्धार केल्याचे दिसत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे भाऊसाहेब रुपनर यांचा फॅबटेक कारखाना. तो आवताडे यांना चालवायला दिला होता. मात्र, आर्थिक अडचणींमुळे तो गेली दोन वर्षे बंद होता. पण, न्यायालयीन प्रक्रियेनंतर तो आवताडेंकडे आला आहे.

दामाजी कारखान्यातील पराभवामुळे आवताडे यांना राजकीय सेटबॅक बसला होता. त्याचा परिणाम आगामी राजकीय वाटचालीवर होऊ नये, या साठी आवताडेंनी तातडीने प्रयत्न करून फॅबटेक कारखाना सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ऊस पट्ट्यात आमदारकी आणि साखर कारखाना हे गणित ठरलेले आहे. त्यामुळे राजकीय भवितव्यासाठी हा कारखाना आवताडेंसाठी महत्वाचा ठरणार आहे.

गेली दोन वर्ष फॅबटेक कारखाना आर्थिक अडचणींमुळे बंद होता. कर्जापोटी बँकेने कर्ज प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. कारखाना हस्तांतरणाची दोन वेळा प्रक्रिया पार पडल्यानंतर अखेर या कारखान्याचा ताबा आवताडे शुगर प्रा. लि. या कंपनीने मिळवला. कारखान्याची गाळप क्षमता ५ हजार टन असून ३० मेगावॉटचा कोजन प्रकल्प, ६५ केएलपीडीचा डिस्टिलरी प्रकल्प आहे. या कारखान्याची क्षमता मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक आहे.

महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवर हा कारखाना असल्यामुळे कार्यक्षेत्राबरोबर पंढरपूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर, सांगोला आणि कर्नाटकातील इंडी भागातील ऊस सहज उपलब्ध होतो. गेली दोन वर्ष कारखाना बंद राहिल्यामुळे ऊस उत्पादकांची गैरसोय झाली होती. शिवाय कारखान्यातील कामगारांनाही इतरत्र स्थलांतर व्हावे लागले. कारखान्याच्या ताब्याची प्रक्रिया बँकेने पार पाडल्यामुळे आता कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत या कारखान्यावरून आमदार समाधान आवताडे यांच्यावर आरोप झाले होते. दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे आवताडे यांच्या राजकीय कारकीर्दीला धक्का पोहोचल्याचे बोलले जात असताना फॅबटेक शुगर हा कारखाना आवताडे परिवारात आला आहे, त्यातून आवताडे गटाला मजबुती मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT