Kolhapur News, 31 August : कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करत त्यांनी पहिली चाल केली आहे.
येत्या 3 सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत घाटगे यांचा पक्षप्रवेश मुश्रीफ यांच्या दारात म्हणजेच गैबी चौकात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर घाटगे यांच्याकडून शरद पवारांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 'वस्ताद येत आहेत' 84 वर्षाच्या युद्ध्याला साथ देऊया, गद्दारांना गाडू या 'मैदान तेच पण डाव नवा, अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjitsinh Ghatge) यांनी कागल विधानसभा मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या 3 सप्टेंबर रोजी त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितित कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकामधील जाहीर कार्यक्रमांमध्ये प्रवेश होत आहे. त्यामुळे या पक्षाच्या तुतारी चिन्हावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना आव्हान देण्यासाठी त्यांनी कंबर कसल्याचं दिसत आहे.
अपक्ष निवडणूक लढवण्यापेक्षा कोणत्यातरी पक्षाचा झेंडा घ्यावा, असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा मतप्रवाह होता. मात्र, अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर भाजपकडून (BJP) त्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास अडचण निर्माण झाली. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासूध अस्वस्थता होती.
अशातच 23 तारखेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत कागलमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी त्यांना, 'राम कृष्ण हरी वाजवा तुतारी' असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात प्रवेश करावा व तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी अशी आग्रही भूमिका मांडली.
कागलमधील विवेक कुलकर्णी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी तुतारी चिन्हाचे लोगो तयार केले आहेत. ते मोबाईलवर चिकटवून आत्तापासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे समरजितसिंह घाटगे यांच्या कापशी खोऱ्यातील कासारी या गावांमध्ये दलित समाजातील बुद्ध विहारामध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमातच या तुतारी चिन्हाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
घाटगे यांच्या हस्ते कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर हे तुतारी असलेला लोगो चिकटवण्यात आला. बघता बघता कागल विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर हा लोगो लागला आहे. त्यामुळे कागल मतदार संघात घाटगे यांनी संपर्कासह प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी हौशी कार्यकर्त्यांच्या या संकल्पनेमुळे त्यांना चांगलाच फायदा होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.