Sambhajiraje Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sambhaji Raje : अन् संभाजीराजे एकदम म्हणाले, ''मला मुख्यमंत्री करा, मी...''

Mayur Ratnaparkhe

Kolhapur News : कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राबाहेर संशोधक विद्यार्थी मागील दहा दिवसांपेक्षा अधिक काळापासून साखळी उपोषणाला बसले आहेत. सरसकट फेलोशिप मिळावी, यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केले आहे. या विद्यार्थ्यांची शनिवारी संभाजीराजे छत्रपती यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी विद्यार्थ्यांनी संभाजीराजेंसमोर आपली समस्या मांडली आणि आम्हाला न्याय मिळवून द्या अशी मागणी केली. त्यावर ''मला मुख्यमंत्री करा, सारथीचा प्रश्न चुटकीत सोडवतो,'' असं संभाजीराजेंनी म्हटलं. या अनपेक्षित प्रतिक्रियेमुळे आंदोलक विद्यार्थीही काहीसे गोंधळल्यासारखे झाल्याचे दिसले. ऐन दिवाळीत उपोषण करू नका, असा सल्लाही या वेळी विद्यार्थ्यांना संभाजीराजेंनी दिला. मात्र, आम्हाला निर्णय द्या आम्ही उपोषण मागे घेतो, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला होता.

महाविकास सरकारच्या काळात राज्यभरातील १ हजार ३१२ विद्यार्थ्यांना सारथीकडून फेलोशिप दिली जात होती. मात्र, सत्ताबदल झाल्यानंतर आता महायुतीच्या सरकारने केवळ २०० विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेद्वारे फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला गेला आहे, तर इतर विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळावी, फेलोशिप विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून मिळावी, संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी असून, यासाठीच कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत संशोधक विद्यार्थ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात संभाजीराजेंनी सारथीचे संचालक अशोक काकडे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. मात्र, काकडे यांनी हा धोरणात्मक निर्णय असून, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करावी लागेल, असं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यावर दिवाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT