Bawankule VS Thorat Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bawankule VS Thorat : बावनकुळेंनी संगमनेरमध्ये जाऊन थोरातांच्या विरोधात दंड थोपटले!

Pradeep Pendhare

Sangamner : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना त्यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात जाऊन ललकारले आहे. सनातन हिंदू धर्म संपविण्याची भाषा करणारे तुम्हाला मान्य आहेत का?, असा सवाल बावनकुळे यांनी थोरातांना केला आहे. "तुम्ही कितीही विरोधी एकत्र या, नरेंद्र मोदी 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान होतील," असा दावाही बावनकुळेंनी केला आहे.

भाजपच्या वतीने बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात संपर्क अभियान सुरू आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात अभियानाचा संपर्क संगमनेर येथून झाला. बावनकुळे यांनी संगमनेर शहरातील व्यापारी, बाजारपेठेतील नागरिक, वेगवेगळ्या समाजातील प्रतिनिधींशी संवाद साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सरकारने केलेल्या विविध योजनांची माहिती दिली. पत्रकांचे वाटप केले. बावनकुळे यांनी शरद पवार आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर सडकून टीका केली.

.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बावनकुळे म्हणाले, "सनातन हिंदू धर्म संपवण्याची उदयनिधी यांची भाषा शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांना मान्य आहे का? हिंदू धर्माने संस्कृती रक्षणाचे काम केले आहे. धर्म संपविण्याच्या भाषा करणाऱ्यांना मतदानातून धडा शिकवावा. मोदीजींना पराभूत करण्यासाठी देशातील 28 पक्ष एकत्र आले आहेत, पण कितीही विरोधकांनी एकत्र येऊ देत, 2024 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होतील."

गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी विविध योजनांच्या माध्यमातून विविध समाज घटकांना विकासाशी जोडले. मोफत धान्य ते विश्वकर्मा योजना सर्वसामान्यांपर्यंत नेल्या. केंद्र सरकारचे यश संपूर्ण देश पाहत आहे. आता 22 जानेवारीला देशात पुन्हा दिवाळी साजरी होणार आहे. अयोध्येत रामाची स्थापना होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून पाच हजार नागरिकांना अयोध्या दर्शनासाठी नेणार असल्याची ग्वाही बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी दिली.

नगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आमदार वैभव पिचड, लोकसभा समन्वयक राजेंद्र गोंदकर, महिला जिल्हाध्यक्ष कांचन मांढरे, तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, नगर शहराचे महेंद्र गंधे या वेळी उपस्थित होते.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT