BJP MLA Sudhir Gadgil questions Minister Chandrakant Patil over Sangli mega recruitment, citing injustice to loyal party workers. sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli BJP : चंद्रकांत पाटलांच्या भूमिकेविरोधात भाजप आमदाराचाच लेटरबॉम्ब; मेगा भरतीला विरोध करून निष्ठावंतासाठी मैदानात

Sangli BJP : सांगलीतील मेगा भरतीमुळे जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत भाजपा आमदार सुधीर गाडगीळ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना थेट पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.

Rahul Gadkar

कोल्हापूरनंतर आता सांगली भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. भाजपमधील निष्ठावंत आणि नव्याने आलेल्या नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात होत असलेल्या मेगा भरतीमुळे भाजपमधील निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याची भावना जुन्या कार्यकर्त्यांना आहे. यावरूनच भाजपचे शांत आणि संयमी आमदार समजले जाणारे सुधीर गाडगीळ यांनी थेट पालकमंत्र्यांच्या भूमिकेविरोधात लेटर बॉम्ब टाकला आहे.

या पत्रात, 'महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बाहेरचे कार्यकर्ते प्रवेश करत असल्याने जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मात्र या निष्ठावंतांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,' असा इशाराच आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिला. 'पालकमंत्र्यांची काही जणांकडून दिशाभूल केली जात आहे. महापालिका क्षेत्रात 6 माजी नगरसेवकांनी प्रवेश केला असताना 22 तिकिटे कुणाला?' असा सवालही त्यांनी पत्रातून केला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली जिल्ह्याचे दौरे वाढले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासह अनेकांचे पक्ष प्रवेश झाले आहेत. मात्र याच पक्षप्रवेशावरून उमेदवारीचे गणित मांडत असताना निष्ठावंतांची नाराजी वाढली आहे. आता या निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी आमदार गाडगीळ यांनी थेट पालकमंत्र्यांविरोधात भूमिका घेत पत्रकाद्वारे खदखद व्यक्त केली आहे.

आमदार गाडगीळ पत्रात काय म्हणाले?

"महापालिका निवडणुकीसाठी पक्षाने सज्जता सुरू केली आहे. पक्षात नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू आहे. मात्र यामुळे निष्ठावंत व दिवसरात्र राबणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. काहीजण पालकमंत्र्यांची दिशाभूल करून आपल्याला हवे तसे वक्तव्य करून घेत आहेत. पालकमंत्र्यांनी २२ तिकिटे देणार असल्याचे सांगितले. मात्र महापालिका क्षेत्रात नव्याने केवळ 6 माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला आहे. मग 22 तिकिटे कुणाला देणार?

केवळ पूर्वी ते निवडून आले होते म्हणून उमेदवारी देणे योग्य नाही. त्या प्रभागातील कार्यकर्त्यांची मते, जनतेचा विचार करून उमेदवारीचे वाटप होईल. कुणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेऊ. गत महापौर निवडणुकीत काही नगरसेवक फुटल्यामुळे पक्षाला तोटा झाला होता. मात्र त्यांनी चूक मान्य करून विधानसभा निवडणुकीत पक्षाचे काम केले आहे, त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात कोणी कोणी काम केले आहे, त्याचा लेखाजोखा पक्षाच्या वरिष्ठांकडे सादर करणार आहे.

काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. तीन वेळा सांगली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. भाजपच्या विजयासाठी प्रामणिक काम केलेल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, यासाठी कटिबद्ध आहे,' असे आमदार गाडगीळ यांनी पत्रकात नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT