Sangli Congress Crisis Prithviraj Patil MP Vishal Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अखेर पृथ्वीराज पाटलांनी काँग्रेस सोडण्याचे कारण सांगितलेच? विशाल पाटलांचे नाव न घेत केली टीका; म्हणाले, 'त्यांनी बंडखोरी...'

Sangli Congress Crisis : सांगली जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात काँग्रेसला सोडणाऱ्यांची यादी मोठी बनत आहे. आता या यादीत जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटलांचेही नाव आले आहे. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Aslam Shanedivan

Summary :

  1. गेल्या दोन महिन्यांत काँग्रेसला सांगलीत सलग मोठे धक्के बसले आहेत.

  2. जयश्री पाटील यांच्यानंतर आता जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

  3. काँग्रेस सोडण्याचे खापर पृथ्वीराज पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर फोडले असून अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे.

Sangli News : गेल्या दोन महिन्यात सांगलीत काँग्रेसला मोठे धक्के बसले असून नुकताच जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाने मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून काँग्रेस अद्याप सावरलेली नसतानाच भाजपने दुसरा मोठा झटका दिला. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला. त्यांनी आपल्या राजीनाम्या वेळी काँग्रेसमधील नेत्यांसह कार्यकर्त्यांचे आभार मानले होते. पण आता त्यांनी आपल्या काँग्रेस सोडण्याचे खापर थेट खासदार विशाल पाटील यांच्यावर फोडले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये असलेला सुप्त संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे.

2019 आणि त्यानंतर पाच वर्ष पूर्ण तयारी करून पुन्हा 2024 मध्ये पृथ्वीराज पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत दंड थोपटले. स्थानिक नेत्याकडून विश्वासघात केल्याने त्यांचा पराभव झाला. जयश्री पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे मतांची विभागणी झाली आणि त्यांचा जेमतेम 35 हजारांच्या घरात पराभव झाला. हीच मते जयश्री पाटील यांना पडली. यामुळे खचलेले पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसला न सोडता 2029 चा शब्द काँग्रेस देईल असा विश्वासात होते. पण काँग्रेसकडून मदतीची हमी नेतृत्वाकडून न मिळाल्याने त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांचा रोख खासदार विशाल पाटील यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे.

पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘काँग्रेस पक्षाने जी जबाबदारी दिली, त्याबद्दल नेहमीच मी कृतज्ञ आहे. पक्षाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य होते. मात्र स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीमुळे हा निर्णय मला घ्यावा लागला. विधानसभेला दोनदा पराभव झाला असल्याने तिसऱ्यांदा तुम्हाला उमेदवारी मिळणार नसून आमच्या घरातील उमेदवार निवडणुकीला उभारणार असल्याचा निरोप देण्यात आला. तिसऱ्यांदा पराभव झाला असता, तर तो झेपला नसता. या सर्व प्रकारात काँग्रेस पक्षाबाबत नाराजी नाही. राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, विश्‍वजित कदम आदी नेत्यांबाबत नाराजी नाही. त्यांनी नेहमी सहकार्य केले. मात्र स्थानिक परिस्थितीमुळे कुचंबणा झाल्याची नाराजी पाटील यांनी बोलून दाखवली आहे.

...त्यांच्याशी वैयक्तिक वैर नाही

यावेळी त्यांनी जयश्री पाटील यांच्याबाबत स्पष्टीकरण देताना, माझ्या संस्थेत कोणते घोटाळे आहेत, चौकशी सुरू आहे, असे काहीही नाही. विधानसभेच्या दोन्ही निवडणुका विकासाचे व्हिजन ठेवूनच लढवल्या होत्या. मात्र दोन्हीमध्ये पराभव पत्करावा लागला. आताही भाजपमध्ये प्रवेश केला तो सांगलीला डोळ्यासमोर ठेवूनच.

लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी काम केले. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभेत बंडखोरी झाली. ती रोखणे आवश्यक होते. मात्र आपल्याच घरातील उमेदवाराच्या पाठीशी ते राहिल्याने मत विभागणी झाली. त्यामुळे पुन्हा पराभवास सामोरे जावे लागले. विशाल पाटील अपक्ष म्हणून खासदारकीची निवडणूक जिंकले असले, तरी ते काँग्रेसच्याच मतांवर निवडून आले, हे वास्तव आहे. आता भाजपत गेलो असल्याने विशाल पाटलांसाठी काँग्रेस मोकळी आहे.

‘महापालिकेच्या नेतृत्वाची ऑफर’

पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘तिसऱ्यांदा विधानसभेची उमेदवारी मिळणार नाही, असा निरोप माझ्यापर्यंत पोहोचविण्यात आला. त्याऐवजी महापालिका निवडणुकीवेळी नेतृत्व करण्याची ऑफर देण्यात आली. मला उमेदवारी देण्यात येणार नाही, असाच याचा अर्थ होता. दोनदा पराभवाची चव घेतल्याने तिसऱ्यांदा पुन्हा विषाची परीक्षा घ्यायची का, असा प्रश्न माझ्यासमोर होता असेही त्यांनी सांगत आपण भाजपचा पर्याय घेतल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

FAQs :

प्र.१: पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेस का सोडली?
उ.१: त्यांनी आपल्या निर्णयाचे खापर थेट खासदार विशाल पाटील यांच्यावर फोडले.

प्र.२: काँग्रेसला सांगलीत किती धक्के बसले?
उ.२: गेल्या दोन महिन्यांत जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील या दोन मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

प्र.३: भाजपला सांगलीत काय फायदा झाला?
उ.३: काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद सांगली जिल्ह्यात लक्षणीय वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT