
सांगली : सांगली काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश झाला. यामुळे आणखी एक काँग्रेसी नेत्याने कमळ हाती घेतले. पण भाजपच्या जहाजात आधीच इतकी गर्दी असताना, यापूर्वीच जयश्री पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पृथ्वीराज पाटील यांनी हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामागची कारणे काय आणि त्यांना भाजप किंबहुना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय शब्द दिलाय? याची सांगलीच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पृथ्वीराज पाटील यांचे वडील सहकारमहर्षी गुलाबराव पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. एकेकाळी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. सहकार क्षेत्रात त्यांनी मोठे काम उभे केले. ते राज्य बँकेचे अध्यक्षही होते. पुढे सहकारी क्षेत्रातील धोरणांवरून वसंतदादांशी त्यांचे खटके उडाले. बॅ. ए. आर. अंतुले यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती, इतके त्यांचे दिल्ली आणि मुंबई दरबारी वजन होते.
पृथ्वीराज यांनी वडिलांच्या पश्चात राजकारणात थोडा उशीरा प्रवेश केला. आधी शिक्षण संस्था उभी करून स्वतःचा कर्तृत्व सिद्ध केले. 2014 मध्ये ते जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष झाले. 2 विधानसभा निवडणुका लढवल्या. 2019 मध्ये 87 हजारांवर तर 2024 ला काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतरही 75 हजारांवर मते घेतली. तीच त्यांची ताकद ठरली आणि भाजपने ‘क्लीन चेहरा’ म्हणून त्यांना भाजपात प्रवेश दिला.
खरंतर पृथ्वीराज पाटील यांच्या प्रवेशाला अनेकांचा विरोध होता. काँग्रेसमधीलच त्यांच्या कट्टर विरोधक जयश्री पाटील यांनी त्यांना ओव्हरटेक करत आधीच भाजप प्रवेश केला होता. परिणामी, पृथ्वीराज पाटील यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद झाले आहेत, असे चित्र निर्माण झाले होते. परंतु, चक्रव्यूह भेदण्यात ते माहीर असल्याचे त्यांनी 2024 ला विधानसभेची उमेदवारी पदरात पाडून घेताना दाखवून दिले होते. पुन्हा एकदा त्यांना भाजपात निर्माण झालेला चक्रव्यूह भेदला. तोही शिस्तबद्धपणे आणि कुणालाही न दुखावता.
याच सगळ्या गोष्टींमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विश्वासने सोबत घेतले, असे मानले जात आहे. पण हे करताना फडणवीस यांनी पृथ्वीराज पाटील यांना नेमका शब्द काय दिला आहे, याची चर्चा रंगली आहे.
पृथ्वीराज पाटील यांच्यावर कोणताही आरोप नाही, कोणत्याही संस्थेत ते अडकलेले नाहीत, कोणत्याही ठेक्यात अफरातफरीची भानगड नाही. त्यामुळे ते काही लपवण्यासाठी भाजपमध्ये गेलेले नाहीत, हे स्पष्ट आहे. पण आता भाजप त्यांना काय देणार, याकडे लक्ष असेल. आगामी काळात पहिला फड आहे तो महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा. भाजपात प्रचंड गर्दी झाली आहे. मूळ भाजपचे विरुद्ध आयाराम, असा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जुन्यांनी किती काळ सतरंजी उचलायची, अशी टीकादेखील सुरु झाली आहे.
मातब्बर नेत्यांच्या समर्थकांना उमेदवारी हवी आहे. या गर्दीत आमदार सुधीर गाडगीळांचे किती? जयश्रीताईंचे किती? पृथ्वीराज पवारांचे किती? धीरज सुर्यवंशींचे किती? शेखर इनामदारांचे किती? दिनकरतात्यांचे किती? आणि आता पृथ्वीराज पाटलांचे किती, हा प्रश्न अर्थातच चर्चेला आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही कसोटी असेल. पृथ्वीराज पाटील यांनीही सन्मानजनक जागांचा शब्द घेतला आहे, अशी माहिती मिळते आहे. आता भाजपात कुणाला किती सन्मान आहे, हे निवडणूक लागल्यानंतरच कळणार आहे.
पृथ्वीराज पाटील यांची आमदार किंवा खासदार व्हायची मनिषा काही लपून राहिलेली नाही. 2019 ला थोडे गणित चुकले, काहींनी आतून कार्यक्रम केला, अशी जाहीर टीका तेव्हा झाली होती. 2024 ला त्यांचे गणित काँग्रेसमधील बंडखोरीने बिघडवले होते. या स्थितीत वसंतदादा घराण्यातून विरोध होत राहणार, याची स्पष्टता आल्यानंतर त्यांनी नव्या दिशेचा शोध घेतला आणि तो आज भाजपमध्ये येऊन थांबला आहे. त्यांनी सांगलीच्या विकासाची पंचसुत्री मांडली आहे. त्यासाठी बळ देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांना केले आहे.
त्यासोबत काही गोपणिय चर्चांमध्ये त्यांना काय मिळाले असे, याची उत्सुकता नक्कीच आहे. त्यात भविष्यात लोकसभा, विधानसभा, विधान परिषदेचा शिक्षक मतदार संघ, महामंडळावर संधी आदींबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. फडणवीस यांनी योग्य ठिकाणी योग्य वेळी संधी दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे समजते.
आता आव्हान आहे, श्रीमती जयश्री पाटील यांच्याशी जुळवून घेण्याचे. त्यांनी पृथ्वीराज पाटील यांच्याआधी भाजपचा रस्ता धरला. त्यांनाही काही शब्द दिल्याचे समजते. या दोन्ही गटांचे कसे जुळणार, महापालिका निवडणुकीत कुणाला जास्त जागा मिळणार, कुणाचे कुठे वजन आहे, याचा फैसला कसा होणार, याकडे लक्ष असेल. भाजपमध्ये राहून भांडता येत नाही, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचा सुप्त संघर्ष कसा आकार घेतो, याकडेही लक्ष असेल.
या परिस्थितीत काँग्रेससमोरील आव्हान आणखी कठीण झाले आहे. कारण, दहा वर्षात पृथ्वीराज पाटील यांनी सांगलीत काँग्रेस चांगली बांधली होती. नव्या कार्यकर्त्यांचा संच तयार केला होता. मातब्बरांची संख्या कमी असली तरी तळागाळात पोहचलेल्या माणसांना त्यांनी सोबत घेतले होते. ही वजाबाकी झालेली आहे. आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यासाठी या स्थितीत लढण्यासाठी नव्याने बांधणी करावी लागणार आहे.
विशाल पाटील यांच्यासाठी होल वावर इज आवर, असे झाले असले तर या वावरात नव्यान मशागत करणे, घात येण्याची वाट पाहणे, मग पेरणी करणे हे कठीण आव्हान आहे. विशाल यांना पुढच्या लोकसभेसोबत विधानसभेला त्यांच्या मनासारखा उमेदवार देता येईल, मात्र तो निवडून आणायचा असेल तर मोठ्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. आता जयश्रीताई आणि पृथ्वीराजबाबा यांचा निर्णय मान्य नसलेले कोण-कोण त्यांच्या हाताला लागतात, याकडे सांगलीचे लक्ष असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.