Sangli Congress : जिल्ह्यात ६ नगरपालिका आणि २ नगरपंचायतींचा निवडणूक आखाडा सुरू आहे. यापैकी ६ ठिकाणी काँग्रेसने सपशेल माघार घेतली आहे. या सहाही ठिकाणांहून ‘हात’ चिन्ह गायब आहे. फक्त पलूस आणि जत नगरपालिकेत काँग्रेस लढत आहे. शिराळा, ईश्वरपूर, आष्टा, तासगाव, आटपाडी आणि विटा या ठिकाणी काँग्रेसने ‘भाजप विरोधासाठी तडजोड’ या नावाखाली सपशेल शरणागती पत्करली आहे. मुख्य नेत्यांनी पक्षांतर केल्यानंतर या ठिकाणी पक्ष बांधणीसाठी प्रयत्नच झाले नाहीत, हे मुख्य दुखणे आहे.
दीर्घ प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत. या काळात पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. काँग्रेसचे मातब्बर नेते रामराम ठोकून भाजपमध्ये गेले आहेत. त्यात माजी आमदार सदाशिवराव पाटील, आमदार सत्यजित देशमुख ही प्रमुख नावे घेतली जातात. परिणामी, अनेक ठिकाणी काँग्रेसची (Congress) अवस्था अत्यंत बिकट आहे. त्याचा परिणाम, नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत दिसू लागला आहे.
विटा नगरपालिका हा काँग्रेसचा गड होता. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी पक्षांतर केले आणि पुन्हा तेथे काँग्रेसला प्रबळ नेतृत्व उभे करता आले नाही. खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात आमदार विश्वजित कदम, माजी आमदार मोहनराव कदम यांना मानणारा गट आजही आहे. याच तालुक्यातून जितेश कदम यांच्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ करण्याचा विचार देखील केला जातो; परंतु विटा पालिका क्षेत्रात कार्यकर्त्यांची फरफट होत राहिली आहे.
काँग्रेस नेत्यांनी विट्यामध्ये भाजपच्या विरोधात शिवसेनेला मोकळे रान दिले आहे. तीच अवस्था आटपाडीत आहे. येथे काँग्रेस औषधाला तरी सापडेल का? असा शोध घ्यावा लागतो. त्या तुलनेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने येथे लढायचे नाही, असे ठरवलेले असताना सादिक खाटीक नावाचे कार्यकर्ते हाती तुतारी घेऊन किमान पक्ष जिवंत ठेवण्याची धडपड करत आहेत. तीही चर्चा होत आहे.
ईश्वरपूर नगरपालिकेत काँग्रेसला लढायचे होते, मात्र आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यात ‘हात’ विरुद्ध ‘तुतारी’ अशी लढत करायची नाही, असा करार झाला आहे. तो पाळला जावा, यासाठी ईश्वरपुरात काँग्रेसने सपशेल माघार घेतली आहे. कार्यकर्ते ए-बी फॉर्म द्या, आम्ही लढतो, असे सांगत असताना तिथे काँग्रेसने ताकद दिली नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
जयंत पाटील यांच्यासोबत काँग्रेसचा पक्ष कार्यालय इमारतीवरून वाद सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे किती जमेल, याबद्दलही शंका आहेत. काँग्रेसने तडजोड केली असली तरी जिल्हा परिषद निवडणुकीत जयंतरावांची राष्ट्रवादी (NCP) परतफेड करेल का, हाही प्रश्न आता कार्यकर्ते विचारत आहेत. आष्ट्यात त्याहून वेगळी स्थिती नाही.
शिराळ्यात सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर येथे काँग्रेसची अवस्था फारशी चांगली राहिलेली नाही. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. मात्र, काँग्रेस कुठेच चित्रात दिसत नाही. तेथे काँग्रेसच्या चिन्हावर भविष्यात कधी निवडणूक लढली जाईल, याबद्दल सांगणे कठीण. तीच अवस्था तासगावमध्ये झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सावली एवढी मोठी होती की, येथे काँग्रेसची वाढ खुंटली. दिवंगत आर. आर. पाटील यांच्याशी तडजोडीच्या राजकारणात काँग्रेस इथे वाढलीच नाही. आज पालिकेला काँग्रेसचे चिन्ह येथून गायब आहे.
पलूस आणि जतमध्ये मात्र काँग्रेस पूर्ण ताकदीने लढताना दिसत आहे. जतमध्ये राष्ट्रवादीशी चर्चा अंतिम टप्प्यात असताना काँग्रेसने काही अटी-नियम अमान्य करत स्वतंत्र पॅनेल लावले आहे. या ठिकाणी माजी आमदार, जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत पूर्ण ताकदीने लढताना दिसत आहेत. जिल्ह्याचे काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी पलूसमध्ये चांगली व्यूहरचना केली आहे. दोन्ही ठिकाणी काँग्रेस सत्तेचा दावा करत आहे. अन्यत्र मात्र काँग्रेसची अवस्था खूपच बिकट आहे.
नेमक्या याच प्रश्नावर आमदार विश्वजित कदम यांनी एका पत्रकार परिषदेत उत्तर दिले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमुळे काही तालुक्यांत राष्ट्रवादी वाढत राहिली आणि काँग्रेसकडे दुर्लक्ष झाले, हे त्यांनी कबूल केले होते. आता परिस्थिती वेगळी आहे. नव्याने काँग्रेस उभारणीचा प्रयत्न होणार आहे का, हेच महत्त्वाचे आहे. अन्यथा, वसंतदादा पाटील यांच्या जिल्ह्यात काँग्रेस तीन तालुक्यांपुरतीच उरेल, हे वास्तव आहे.
खरंतर सांगली हा काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला होता. वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांनी सांगलीत काँग्रेसला सोन्याचे दिवस दाखवले. पण नंतरच्या काळात राजारामबापूंनी जनता पक्षात प्रवेश केला. वसंतदादा विरुद्ध बापू वादाचा काँग्रेसला मोठा फटका बसला. मग राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्ह्यातील कारखानदार आणि संस्थानिकांनी हातावर घड्याळ बांधले. त्यामुळे पंजाचे पतन सुरु झाले. प्रतिक पाटील यांचा लोकसभेला पराभव झाल्यानंतर सांगली, मिरज शहरातूनही काँग्रेस गायब झाली. याला जयंत पाटील यांनीही मोठा हातभार लावला.
काही काळ विशाल पाटील यांनी जिल्ह्यात काँग्रेसचे नेतृ्त्व केले. पण 2019 मध्ये त्यांनी आधी स्वाभिमानी आणि नंतर अपक्ष निवडणूक लढवली. आता जिल्ह्यातील बहुतांश नेते भाजपमध्ये गेले आहेत. आता तर फक्त विश्वजीत कदम हेच एकमेव काँग्रेस आमदार राहिले आहेत. तर जतमध्ये जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये धुगधुगी राहिली आहे. इतर ठिकाणी मात्र काँग्रेसचा आनंदी आनंद आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी काँग्रेसचा पंजा जिल्ह्यातून गायब झाल्याचे दिसून येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.