
Sangli News : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिनाचा कार्यक्रम सरू असतानाच दुसरीकडे मात्र भाजप पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम सुरू होता. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी शरद पवारांसह पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना जोरदार धक्का देत आपल्या गळाला विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांना लावले. यामुळे आगामी स्थानिकच्या तोंडावर जिल्ह्यात जयंत पाटील यांना पुन्हा समिकरण जुळवावी लागणार आहेत. पण भाजपसाठी आता आगामी स्थानिकसाठी राजकारण सोपे झाले आहे. पण शिंदे शिवसेनेसमोर आणखी तगडे आव्हान निर्माण झाले आहे.
वैभव पाटील यांचे आजोबा माजी आमदार हणमंतराव पाटील 1980 मध्ये पहिल्यांदा समाजवादी काँग्रेस पक्षात आले. आमदार झाले. शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसमध्ये ते होते. त्यावेळी शरद पवार यांना सोडून चाळीस आमदार काँग्रेसमध्ये गेले. सोबत सहा आमदार राहिले त्यात हणमंतराव पाटील होते. त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंद केले होते. पुढे त्यांचे वडील काँग्रेसमध्ये गेले.
त्यानंतर ते 2024 च्या विधासनभा निवडणुकीच्या आधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले होते. पण ऐन वेळी त्यांनी स्वगृही परतून विधानसभेसाठी दंड थोपाटले होते. त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवली होती. ज्यात त्याचा पराभव झाला. तेव्हापासून ते अस्वस्थ होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनीच वैभव पाटील यांनी शरद पवार यांना धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वैभव पाटील यांनी कार्यकर्त्यांसह मुंबईत भाजप प्रवेश केला. यावेळी माजी नगरसेवक आणि युवक नेते पदमसिंह पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
सध्या याच प्रवेशाची आणि धक्क्याची जिल्ह्यासह राजभर चर्चा होताना दिसत आहे. वैभव पाटील विट्याचे माजी नगराध्यक्ष राहिले असून यांच्या कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेशामुळे आता विट्यातील राजकारण बदलणार आहे. माजी नगराध्यक्ष वैभव पाटील आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची वर्षानुवर्षे विटा शहरावर सत्ता आहे. विटा शहरात अॅड. विनोद गोसावी, भाजपचे मोठे कार्यकर्ते आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर आणि आटपाडीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख असे मोठे नेते येथे आहेत. आता वैभव पाटलांच्या भाजप प्रवेशाने मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. वैभव पाटील यांच्या प्रवेशाने खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे. जी आगामी काळात शिंदेच्या शिलेदाराला धोक्याची घंटा आहे.
दरम्यान वैभव पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देश जगात महासत्ता म्हणून उदयास येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्य प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. विकासाच्या मुद्द्यावर आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबीत सोडवण्यासह भाजपला ताकद देण्यासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विटा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला जाणार आहे. यावेळी माजी आमदार सदाशिव पाटील देखील भाजपमध्ये प्रवेश करतील अशीही घोषणा त्यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आता स्थानिक संस्थांच्या निवडणुकीची दारे उघडली आहे. त्यामुळे विटा नगरपरिषदेसाठी देखील इच्छुकांनी कंबर कसली आहे. येथे या प्रवेशामुळे राजकारण आणखी तापणार आहे. येथे पुन्हा एकदा पारंपरिक पाटील-बाबर गटातच खरा सामना असेल अशा चर्चा रंगल्या आहेत.
दिवंगत माजी आमदार अनिल बाबर यांच्या पश्चात होणारी ही पहिली निवडणूक आहे. त्यांचे चिरंजीव सुहास आता आमदार झाले आहेत. ते शिवसेना शिंदे गटाचे आमदार असून वैभव पाटील यांचे पारंपारिक विरोधक आहेत. वैभव पाटील यांच्या सत्तेला आव्हान देण्याचे काम सुहास बाबर यांनी अनेकदा केले आहे. पण त्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही. पण महायुतीत भाजपनेच आगामी स्थानिकसाठी स्वबळाचा नारा दिल्याने येथे महायुतीतच लढत होणार हे स्पष्ट आहे.
आतापर्यंत राष्ट्रवादीकडे असणारी सत्ता पलटण्याचा प्रयत्न आमदार सुहास बाबर यांनी केले आहेत. गेल्या चार पाच दशकांपासून आधी हणमंतराव आणि त्यानंतर सदाशिवराव आणि आता वैभव पाटील यांची पालिकेत एकहाती सत्ता आहे. त्यांचे 21 नगरसेवक व एक नगराध्यक्ष होते. दिवंगत अनिल बाबर गटाचे दोन नगरसेवक होते. बाबर सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात असून वैभव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. या ठिकाणी भाजपची ताकद मर्यादित असून काँग्रेस फक्त नावापुरती उरलेली आहे. या दोन्ही पक्षांचा नगरपालिका क्षेत्रातील प्रभाव अत्यंत कमी आहे.
पण आता शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपने शिरकाव केला असून शरद पवारांनाही मोठा धक्का दिला आहे. येथे महायुतीतील दोन प्रमुख पक्ष असले तरीही आता स्वबळाच्या नाऱ्यानंतर आता वैभव पाटलांच्या प्रवेशामुळे लढत पाटील विरुध्द बाबर अशीच असेल. तसेच या प्रवेशामुळे आमदार गोपीचंद पडळकर व त्यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांचीदेखील विटा शहरात ताकद वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.