Sangli News : सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत मोठा ट्विस्ट समोर आला आहे. महाविकास आघाडीने फसवणूक केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी, बँकेची निवडणूक बिनविरोध करताना भाजपला सोबत घेतले; मात्र अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी भाजपला बाजूला ठेवून एकतर्फी सत्ता स्थापन करण्यात आली, असा आरोप केला आहे. तसेच शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळला नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
सांगली जिल्हा बँकेची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड बुधवारी बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ संचालक महेंद्र लाड, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या (शिंदे गट) संचालक तानाजी पाटील यांची निवड झाली. यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे एकमेव संचालक गैरहजर होते. उर्वरित २० संचालकांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली.
एकीकडे नाट्यमय घडामोडींनंतर सर्वपक्षीय वरिष्ठ नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध केल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. या निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचाच करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा रंगली आहे.
मात्र, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराज पाटील शर्यतीत असतानाही संख्याबळामुळे काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष बनले आहेत. याच पार्श्वभूमीवर तहात आणि युद्धात मात्र काँग्रेसने बाजी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या घडामोडींवरून भाजपनेही टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना लक्ष्य केले आहे. ही घटना ताजी असतानाच भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनीही महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करताना भाजपला सोबत घेतले; मात्र अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी बाजूला ठेवून आमची फसवणूक करत सत्ता स्थापन केली, असा आरोप महाडिक यांनी केला आहे.
सम्राट महाडिक यांनी, जयंत पाटील देशाबाहेर असल्याचे सांगून बैठक घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. तसेच अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत शिवसेनेच्या शिंदे गटाने महायुतीचा धर्म पाळला नाही, असा आरोपही सांगलीतील शिंदेसेनेवर केला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर सर्वपक्षीय सत्तेच्या समीकरणातून भाजपला बाजूला ठेवल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे सांगली जिल्हा बँकेत आगामी काळात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.