Sangli District Bank Election: सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांची ‘एन्ट्री’; जयंत पाटलांच्या एकहाती वर्चस्वाला ‘ब्रेक!’

Gopichand Padalkar Sangli District Bank Election: सांगली जिल्हा बँक निवडणुकीत जयंत पाटील गटाचे संख्याबळ ११ वरून चारवर आले. गोपीचंद पडळकरांच्या एन्ट्रीने राजकीय समीकरणे बदलली असून अध्यक्षपदासाठी चुरस वाढली आहे.
Sangli DCC Bank Election
Sangli DCC Bank ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

विष्णू मोहिते

Sangli DCC Bank News: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे गेली ११ वर्षे एकहाती नेतृत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या बँकेवरील वर्चस्वाला ‘ब्रेक’ लागला आहे. त्यांच्या पक्षाचे संचालक संख्याबळ ११ वरून थेट चारवर आले, तर त्यांचे कट्टर विरोधक आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बँकेतील ‘एन्ट्री’ने समीकरणे बदलणार आहेत. काँग्रेस ६ जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरला असला, तरी स्पष्ट बहुमत कोणालाच नसल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजपने बँकेच्या कारभारावरून जयंत पाटील यांना लक्ष्य केले होते. कर्जवाटप, वसुली आणि अन्य आर्थिक व्यवहारांवरून भाजप नेत्यांनी विशेषतः पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले. राज्यपातळीवरही हा विषय चर्चेत आणला. त्यामुळे निवडणुकीत जयंत पाटील यांच्यासमोर नेतृत्व टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले होते.

मात्र दुष्काळी परिस्थितीचे कारण पुढे करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय प्रयत्न झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सात, काँग्रेसला पाच, भाजपला चार, शिवसेनेला तीन आणि अजित पवार राष्ट्रवादीला एक जागा देण्याचे सूत्र ठरले. मात्र चार सोसायटी गटांसह दोन आरक्षित जागांवरील तिढा कायम राहिल्याने निवडणूक झाली.

Sangli DCC Bank Election
Satara District Bank Election: अतुल भोसलेंनी फेडला उंडाळकरांचा पैरा : कृष्णा कारखान्यातील मदतीची जिल्हा बँकेतील विजयाने परतफेड

या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या गटाला सर्वाधिक राजकीय फटका तासगाव आणि कवठेमहांकाळमध्ये बसला. तासगावमध्ये आमदार रोहित पाटील यांच्या गटाच्या उमेदवार सुमन पाटील यांचा माजी खासदार संजयकाका पाटील यांनी अवघ्या दोन मतांनी पराभव केला. कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) तानाजी पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितराव घोरपडे यांनी चार मतांनी विजय मिळवला. या दोन्ही निकालांनी जयंत पाटील गटाच्या राजकीय प्रभावाला हादरा दिला असून आमदार रोहित पाटील यांची देखील ही पीछेहाट आहे.

दुसरीकडे ज्या पडळकरांचा अर्ज बाद करण्यापासून त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न झाले, ते पडळकर अखेर विरोधकांचे डाव उद्ध्वस्त करत बँकेत आलेच. त्यामुळे भाजपलाही आपले संख्याबळ वाढवता आले. काँग्रेसने सहा जागांसह सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी चार, भाजप पाच, शिवसेना तीन आणि अजित पवार राष्ट्रवादी तीन असे पक्षीय बलाबल तयार झाले आहे. आता अध्यक्षपदासाठी राजकीय जुळवाजुळव सुरू होण्याची शक्यता आहे.

सर्वांत मोठा पक्ष असूनही काँग्रेसला सत्तेसाठी इतर पक्षांची साथ आवश्यक आहे. विश्वजित कदम यांनी आपली ताकद कायम ठेवली आहे असली तरी आपला अध्यक्ष करण्यासाठी त्यांच्याकडे आव्हाने आहेत. भाजपचेही संख्याबळ वाढल्याने आणि सत्ता त्यांच्या पाठीशी असल्याने कोणताही खेळ होऊ शकतो. त्यामुळे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या ११ वर्षांतील नेतृत्वाच्या तुलनेत यंदा जिल्हा बँकेतील सत्तेचा केंद्रबिंदू बदलल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.

Sangli DCC Bank Election
Satej Patil : 'गोकुळ'वर 4 शासन नियुक्ती सदस्य, मतदानाचाही अधिकार; सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया, 'जनतेने दिलेला कौल...'

तडजोडीची गणिते...

जुन्या, मुरब्बी राजकीय मंडळींनी आपापल्या गटातील विजयासाठी राजकीय तडजोडी केल्याचे स्पष्ट झाले. त्याचमुळे मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ येथील निकालात प्रतिबिंब पाहायला मिळाले. काही वरिष्ठ नेत्यांनी याला दुजोरा दिला.

एक दृष्टिक्षेप...

२०२१ निवडणुक पक्षीय बलाबल - राष्ट्रवादी काँग्रेस- ११, काँग्रेस- ५, भाजप- ४, शिवसेना-१ - एकूण- २१

२०२६ मधील पक्षीय बलाबल - काँग्रेस- ६, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष- ४, शिवसेना- ३, भाजप- ५, राष्ट्रवादी काँग्रेस - ३ - एकूण- २१

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.