

Sangli News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी काँग्रेसचे नेते महेंद्र लाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या संचालकपदाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने २६ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे बुधवारी (ता. १८) होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत महेंद्र लाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता बळावली आहे. न्यायालयीन सुनावणी पुढे गेल्याने अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाचा मार्ग तूर्तास मोकळा झाल्याची चर्चा बँकेच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. आमदार विश्वजित कदम यांचे मेहुणे आणि कुंडल येथील काँग्रेसचे नेते महेंद्र लाड यांची बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वीही त्यांनी दहा वर्षे संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे नव्या सहकारविषयक नियमांच्या आधारे त्यांच्या निवडीला आव्हान देण्यात आले आहे.
महेंद्र लाड यांच्या संचालकपदाला न्यायालयात आव्हान
महेंद्र लाड यांच्या संचालकपदाला भाजपचे कार्यकर्ते महादेव पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. नव्या सहकारविषयक तरतुदी आणि संचालकपदाच्या कालमर्यादेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. बुधवारी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी न्यायालयाचा निर्णय आला असता, तर अध्यक्षपदासाठी पर्यायी नावाचा विचार होण्याची शक्यता होती. मात्र, न्यायालयाने सुनावणी २६ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलल्याने महेंद्र लाड यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
दहा वर्षांच्या संचालकपदाच्या नियमावरून वाद
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बँक संचालकांच्या कार्यकाळासंबंधीच्या नियमांचा आधार घेत महादेव पाटील यांनी महेंद्र लाड यांच्या निवडीला आव्हान दिले आहे. सलग दहा वर्षांपेक्षा अधिक काळ संचालकपदावर राहिलेल्या व्यक्तीला पुन्हा संचालक म्हणून निवडून येण्यास निर्बंध असल्याचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आल्याचे समजते.
याच नियमाचा आधार घेत यापूर्वी राज्यातील सहकार क्षेत्रातील एका वरिष्ठ मंत्र्यालाही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागल्याचा संदर्भ या प्रकरणात दिला जात आहे. त्यामुळे महेंद्र लाड यांच्या संचालकपदाबाबत न्यायालय काय भूमिका घेणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी लाड यांचे नाव आघाडीवर
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी महेंद्र लाड यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याची चर्चा आहे. पहिल्या टप्प्यात अध्यक्षपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता अधिक असल्याने लाड यांच्या नावाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
न्यायालयीन सुनावणी पुढे ढकलल्यामुळे बुधवारी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत त्यांच्या नावाचा विचार करण्यातील तातडीची अडचण दूर झाल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर महेंद्र लाड यांनीही अध्यक्षपदासाठी आपली राजकीय मोर्चेबांधणी अधिक वेगाने सुरू केल्याची चर्चा आहे.
मात्र, २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देते, यावर त्यांच्या संचालकपदाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे तूर्तास अध्यक्षपदाची संधी कायम असली, तरी अंतिम निर्णयापर्यंत या निवडीवर न्यायालयीन प्रकरणाची टांगती तलवार कायम राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.