Sangli Bank Polls; Gopichand Padalkar And Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil : 'नवरदेव होणारे, आता चीनला पळाले!', गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना खोचक टोला

Gopichand Padalkar On Jayant Patil Over Sangli Bank Election : भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर जहरी आणि आक्रमक भाषेत टीका करत असतात.

Aslam Shanedivan

Sangli Bank Election News : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडी बुधवारी (ता. १८) बिनविरोध पार पडल्या. या निवडीत काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने वर्चस्व मिळवले आहे. अध्यक्षपदी काँग्रेसचे संचालक महेंद्र लाड, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) संचालक तानाजी पाटील यांची निवड झाली. या निवडीनंतर सांगलीत समर्थकांनी जल्लोष केला. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सर्वपक्षीय राजकीय समीकरणे जुळवून भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्याची चर्चा रंगली आहे.

या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड होत असताना नवरदेवाप्रमाणे उपस्थित राहणारे जयंत पाटील आता चीनमध्ये जाऊन तोंड लपवून बसले आहेत,’ असा खोचक टोला पडळकर यांनी लगावला. विशेष म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीवेळी पडळकर अनुपस्थित होते. त्यांच्या गैरहजेरीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते.

जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर म्हणाले, निवडणुका घेण्याची वेळ आली की दुष्काळाचे कारण पुढे करायचे आणि अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची वेळ आली की चर्चेला बगल द्यायची, असा दुटप्पी कारभार सर्वांनी पाहिला आहे. जयंत पाटील यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. यापुढे जिल्हा बँकेचा कारभार ठरावीक लोकांच्या हातात केंद्रित राहणार नाही. बँकेतील एकहाती सत्तेला भाजप आव्हान देणार असून, शेतकऱ्यांच्या हिताविरोधात कोणताही निर्णय घेतल्यास त्याला ठाम विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना पडळकर यांनी अध्यक्ष महेंद्र लाड यांच्याकडून चांगल्या कारभाराची अपेक्षा व्यक्त केली. मात्र, यापूर्वीप्रमाणे चुकीच्या पद्धतीने कारभार झाल्यास भाजप गप्प बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बँकेतील सत्तेचे केंद्रीकरण चुकीचे असून, जयंत पाटील यांच्या एकहाती कारभाराला आता काँग्रेसकडूनही आव्हान दिले जात आहे. या राजकीय घडामोडींमध्ये भाजपची भूमिका महत्त्वाची असल्याचेही पडळकर म्हणाले.

बँकेच्या कर्जवाटपाच्या धोरणावर भाष्य करताना त्यांनी कारखानदारांबरोबरच तरुणांनाही आर्थिक मदत मिळण्याची गरज व्यक्त केली. बँकेच्या माध्यमातून कारखानदारांना विविध प्रकारची कर्जे दिली जातात; मात्र युवकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी वैयक्तिक कर्जे उपलब्ध झाली पाहिजेत. तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

संचालक झाल्यामुळे बँकेच्या कारभाराशी संबंधित अधिकची कागदपत्रे मिळवणे आता सोपे होणार असल्याचेही पडळकर यांनी सांगितले. आपण स्वतः बँकेकडून कोणतेही कर्ज घेणार नसून, आपली भूमिका शेतकऱ्यांच्या हिताची असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. बँकेचा कारभार चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी सहकार्य करू; मात्र शेतकरीहिताला बाधा आणणाऱ्या निर्णयांना विरोध करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रस्थापितांच्या हातातून विस्थापितांच्या हातात कारभार येणे, हे भाजपचे यश असल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या भूमिकेवरही पडळकर यांनी भाष्य केले. ‘सध्या भारतीय जनता पक्षामुळे काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे आज जयंत पाटलांना डोळे वटारून दाखवत आहेत,’ असे विधान त्यांनी केले. एकूणच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने बँकेच्या सत्तेत स्थान मिळवले असताना भाजपला डावलल्याच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे आगामी काळात सांगलीच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची धार आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT