Sangli News : गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीवरून वाद पाहायला मिळत असून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गंभीर आरोप केले होते. दरम्यान, जिल्हा बँकेला आरबीआयची नोटीसदेखील आली होती. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले होते. अशातच आता जिल्हा बँकेच्या 444 उमेदवारांच्या नोकरभरतीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. हा निर्णय आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे. तर यासाठी पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
नुकतीच सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांना कर्जपुरवठा केल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीवरून आमदार पडळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती.
त्यांनी, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या कारभाराचा अनागोंदी, भोंगळ आणि भ्रष्टाचारी चेहरा या निमित्ताने समोर आल्याचा आरोप केला होता. तसेच, आता हे प्रकरण बँकेला जड जाणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला होता. या नोटिशीमुळे आणि पडळकर यांच्या इशाऱ्यामुळे संचालक मंडळात प्रचंड खळबळ उडाली होती.
आता बँकेत 444 उमेदवारांच्या नोकरभरतीच्या प्रक्रियेला वेग आला असतानाच पडळकर यांनी नोकरभरतीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला होता. त्यातच बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी आरबीआयने 'कारणे दाखवा' नोटीस बजावली होती. या घटनेला चार दिवसही उलटले नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीला स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे जयंत पाटील यांना मोठा राजकीय धक्का बसल्याची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.
दरम्यान, "सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अखेर स्थगिती दिली!" असे म्हणत पडळकर यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असताना भरती प्रक्रिया सुरू ठेवणे योग्य नसल्याचे लक्षात घेऊन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांनी बँकेची नोकरभरती निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
"या विषयावर आम्ही सुरुवातीपासूनच पारदर्शकता, न्याय आणि नियमांचे पालन व्हावे, अशी ठाम भूमिका घेतली होती. आमदार सदाभाऊ खोत साहेब आणि मी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. सहकार क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार, अपारदर्शकता किंवा फसवणुकीचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही. न्याय, पारदर्शकता आणि गुणवत्तेच्या तत्त्वांशी तडजोड होऊ देणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. या निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच महायुती सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार!" असेही पडळकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.