Sangli News : लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असली तरी सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीत गेलेय काही दिवसांपासून सुरू असलेला वाद मिटायचे नाव घेत नाही. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांनी बंड करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
दुसरीकडे जत येथील माजी आमदार विलासराव जगताप (Vilasrao Jgatap) यांनी भाजपला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपला सांगलीमध्ये मोठा हादरा बसला आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपचा (Bjp) राजीनामा देताना थेट काँग्रेसच्या विशाल पाटील (Vishal Patil) यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात लोकसभेच्या निवडणुकीत मोठी रंगत येणार आहे.
जत येथील भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या भूमिकेमुळे भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून संजय पाटील यांच्या उमेदवाराने त्यांच्या विरोधात रोष समोर येत असतानाच आता माजी आमदार विलासराव जगताप यांनी राजीनामा दिल्याने महायुतीच्या अडचणी वाढलाय आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत सांगली दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र, विलासराव जगताप यांनी भाजपचा राजीनामा देत चंद्रहार पाटील यांना पाठिंबा न देता विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याने संजय राऊत यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सांगलीमधील भाजपची नाराजी उघड
या पूर्वीच सांगलीमधील भाजपची नाराजी समोर आली होती. भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी संजय पैल यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे येत्या काळात भाजपसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहीत राजीनामा दिला आहे. त्यामध्ये पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करीत थेट अपक्ष आमदार विशाल पाटील यांना पाठिंबा दर्शविला आहे.
विशाल पाटील उतरणार निवडणूक रिंगणात
महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून वाद सुरू आहेत. ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याने विशाल पाटील नाराज झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नांना आमदार विश्विजत कदम यांच्याकडून बळं दिलं जात आहे. त्यामुळे येत्या काळात विशाल पाटील सांगलीमध्ये अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
R