Vishwajeet Kadam On Sangli Water Crisis; Devendra Fadnavis And Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishwajeet Kadam : कृष्णा नदी कोरडीठाक, सांगलीत पाणीप्रश्न पेटला! विश्वजीत कदमांनी शिंदेंच्या मंत्र्यालाच दम भरला; 'पाणी सोडा अन्यथा माझ्याशी गाठ!'

Vishwajeet Kadam On Sangli Water Crisis : सांगली जिल्ह्यात दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले असून कृष्णा नदीच्या काठावर पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे.

Aslam Shanedivan

Sangli News : सांगली जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद होत असून, पलूस तालुक्यातील कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांना पाण्यासाठी कसरत करावी लागत असून, पिण्याच्या पाण्यासह शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर कोयना धरणातून कृष्णा नदीच्या पात्रात तातडीने पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे. काही दिवसांपूर्वी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही ही मागणी केली होती. मात्र, अद्याप या प्रश्नावर ठोस निर्णय झालेला नसल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

पाणीप्रश्नावरून आक्रमक झालेल्या शेतकरी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भिलवडी येथे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कोयना धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी आंदोलनस्थळी बोलताना राज्य सरकार आणि संबंधित मंत्र्यांवर जोरदार टीका केली.

‘पाणी सोडा, अन्यथा गाठ माझ्याशी!’ विश्वजीत कदमांचा इशारा

सांगली जिल्ह्याला पाणी देण्याच्या निर्णयात कोणताही मंत्री किंवा अधिकारी अडथळा आणत असेल, तर त्याला जाब विचारू, असा आक्रमक पवित्रा विश्वजीत कदम यांनी घेतला. त्यांच्या या वक्तव्याचा रोख सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे.

पाण्याचे राजकारण करणे म्हणजे बळीराजाच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे, असे सांगत कदम यांनी सरकारला तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले. येत्या दोन दिवसांत कृष्णा नदीत पाणी सोडले नाही, तर तीव्र आंदोलन छेडून रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनामुळे सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील पाणीवाटपाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. कोयना धरणातून पाणी सोडण्याबाबत प्रशासन आणि सरकार काय निर्णय घेणार, याकडे आता शेतकरी आणि नदीकाठच्या गावांचे लक्ष लागले आहे.

नेमकं काय म्हणाले विश्वजीत कदम?

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेती आणि जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. त्यामुळे कोयना धरणातून कृष्णा नदीत तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी विश्वजीत कदम यांनी केली.

‘पाणी सोडा, अन्यथा गाठ माझ्याशी आहे,’ असा इशारा देत त्यांनी पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करू नये, असेही स्पष्ट केले. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून कृष्णा नदीतील पाणीटंचाईची परिस्थिती मांडल्याचे सांगितले.

कर्जतमधील वृक्षतोडीवरूनही मुख्यमंत्र्यांना टोला

दरम्यान, कर्जत परिसरातील प्रस्तावित प्रकल्पांमुळे सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या वादावरूनही विश्वजीत कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ‘झाडे लावली की पाऊस पडतो, हे आम्ही शिकलो आहोत; पण महाराष्ट्रातील काही लोक शिकलेले दिसत नाहीत. हे दुर्दैव आहे,’ अशा शब्दांत त्यांनी वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सरकारला टोला लगावला.

एका बाजूला सांगली जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना, दुसरीकडे पर्यावरण आणि वृक्षतोडीचा प्रश्नही चर्चेत आहे. त्यामुळे पाणीवाटपाचा तिढा सोडवण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाबाबत सरकार कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT