Water Crisis : तटकरेंपाठोपाठ आता स्वतः पालकमंत्रीच संतापले; उदय सामंतांचे थेट निलंबनाचे आदेश, नेमकं काय घडलं?

Uday Samant On Drought And Water Crisis : रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी आपले रौद्ररूप दाखवत ‘थेट हक्कभंग आणू’ असा इशारा दिला होता.
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या घटनेला सात-आठ दिवसांचा अवधी झाला नाही, तोच पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत प्रचंड संतापल्याचे दिसून आले.

प्रशासकीय नाकर्तेपणा उघडकीस आल्यानंतर सामंत यांनी संताप व्यक्त करत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर केवळ कारवाई न करता त्यांना थेट निलंबित करा, असे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर आता जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रत्नागिरी पंचायत समितीच्या शामराव पेजे सभागृहात आयोजित आगामी तालुक्यातील टंचाई निवारण कृती आराखड्याच्या बैठकीत ते बोलत होते.

रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तटकरे यांनी विकासकामांवरून आक्रमक पवित्रा घेतला होता. मंजुरी मिळालेल्या कामांचे कार्यारंभ आदेश जाणीवपूर्वक रोखले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. तसेच, बैठकीतच ‘माझी कामे अडवली तर थेट हक्कभंग आणू’ असा सज्जड इशारा दिला होता.

Uday Samant
Uday Samant: दुष्काळातही कार्यक्रमात लाखोंची उधळपट्टी, अखेर सामंतांचा खुलासा

यानंतर सामंत यांनी मध्यस्थी करत आठ दिवसांत सर्व कामांचे कार्यारंभ आदेश काढले जातील, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर हा वाद शांत झाला होता. प्रशासनानेदेखील अवघ्या काही तासांतच खेड तालुक्यातील सुमारे अडीच कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना तातडीने कार्यारंभ आदेश दिले.

प्रशासनाच्या या कामाची जिल्ह्यात चर्चा सुरू असतानाच प्रशासकीय नाकर्तेपणा उघडकीस आला आहे. यावर खुद्द पालकमंत्री सामंत यांनीच संताप व्यक्त केला आहे. प्रशासक नियुक्त असलेल्या तालुक्यातील ६२ ग्रामपंचायती आहेत. मात्र, तेथून टंचाई आराखड्याचा एकही प्रस्ताव तयार करण्यात आला नसल्याची गंभीर बाब उघडकीस आल्याने सामंत प्रचंड संतापले.

त्यांनी, ‘२५ वर्षे मी राजकारणात आहे, पण तुमच्यापेक्षा शहाणा आहे. तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्याचा तुमचा डाव आहे का?’ असा थेट सवाल केला. तसेच, निष्काळजीपणा करणाऱ्या सर्व ६२ प्रशासकांना तत्काळ हटवून नवीन अधिकारी नेमण्याचे सक्त आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. या आदेशानंतर आता जिल्हा परिषदेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायतीनिहाय टंचाई आराखड्याचा आढावा पालकमंत्री उदय सामंत यांनी घेण्यास सुरुवात केली. ९५ पैकी ६२ ग्रामपंचायतींवर प्रशासक आहेत. त्यामुळे प्रशासकांनी टंचाई आराखडा तयार करून पाठवला आहे का, याची माहिती देण्यास त्यांनी सांगितले. मात्र, त्यावेळी कोणीही प्रतिसाद दिला नाही.

‘राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे. आपण सर्वांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. भविष्यातील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि जनतेच्या हितासाठी काम केले पाहिजे,’ असे आवाहनही सामंत यांनी केले. मात्र, काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे सामंत यांनी स्वतः प्रशासकांची यादी घेतली आणि नावे घेऊन आढावा घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी वस्तुस्थिती पुढे आली आणि मंत्री सामंत प्रचंड संतापले.

‘मी घेतलेल्या आढाव्यामध्ये एकाही प्रशासकाने टंचाई आराखडा तयार करून पाठवलेला नाही. यापेक्षा दुसरी दुर्दैवी बाब कोणतीच नाही. तुम्हाला गांभीर्य लक्षात येत नाही का? तुम्ही तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल, तर ते चालू देणार नाही. या सुस्तावलेल्या सर्व प्रशासकांना बदला आणि नवीन प्रशासकांच्या नियुक्त्या करा,’ असा आदेश त्यांनी दिला.

Uday Samant
Uday Samant : कर्जवसुलीसाठी बॅंका त्रास देत असतील तर मला फोन लावा : उद्योगमंत्र्यांचा सल्ला

हलगर्जी करणाऱ्यांना निलंबित करा

‘तालुक्याच्या टंचाई आराखड्याला मंजुरी द्या; परंतु हे महामहीम कधी टंचाई आराखडा देणार, मला माहिती नाही. माझ्या जनतेला त्रास झाला नाही पाहिजे. यासाठी ९ तारखेपर्यंत सर्व ग्रामपंचायतींचे टंचाई आराखड्याचे प्रस्ताव आले पाहिजेत. हलगर्जीपणा करणाऱ्यांवर केवळ कारवाई न करता त्यांना थेट निलंबित करा,’ असे आदेश सामंत यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com