Sangli, 30 October : कृष्णा नदी कोरडी पडली आहे. शेतीला, प्यायला पाणी नाही. तरी तुम्ही धरणाचे पाणी सोडू देत नाही. आमच्या हक्काचे पाणी अडवण्याचा हक्क साताऱ्यातील नेत्यांना कुणी दिला, अशा शब्दांत सांगली जिल्ह्यातील आमदारांनी आज साताऱ्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा समितीची बैठक शुक्रवारी (ता. ३० ऑक्टोबर) झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, विश्वजित कदम, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, रोहित पाटील, सुहास बाबर, गोपीचंद पडळकर, माजी आमदार अरुण लाड, माजी खासदार संजय पाटील यांच्यासह अधिकारी या वेळी उपस्थित होते. मंत्री देसाई ऑनलाईन सहभागी झाले होते.
गेल्या १५ दिवसांत कोयना धरणातून पाणी सोडण्यात साताऱ्यातून आडकाठी येत असल्याचा मुद्दा जिल्ह्यातील नेत्यांनी तीव्रपणे मांडला. मंत्री देसाई बोलत असताना पडळकरांनी ‘पाणी सोडायचे की नाही, हे ठरविण्याचा तुमचा काय संबंध’, असा थेट सवाल केला. खासदार विशाल पाटील यांनी आकडे मांडत कोंडी केली. त्यांनी ‘नदीवरील उपसाबंदी साताऱ्यात का लावली नाही? सांगलीला वेगळा न्याय का’, असा सवाल केला.
जयंत पाटील यांनी ‘दुष्काळाचा ताण घेऊन चुकीचे निर्णय लादू नका. पाणी पुरेसे आहे, फक्त नियोजन परफेक्ट करायला हवे’, अशा शब्दांत कान टोचले. विश्वजित कदम यांनी शेतकऱ्यांना कोरड्या नदीत बसून आंदोलन करावे लागत असल्याबाबत संताप व्यक्त केला. यावर्षी पाणीपट्टी माफ करा, अशी मागणी त्यांनी केली. संजय पाटील यांनीही ‘पुन्हा असला प्रकार का खपवून घ्यायचा’, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.
सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या आक्रमक भूमिकेवर पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी आपली भूमिका मांडली. ‘मी पाणी अडवलेले नाही, पाण्याचे समन्यायी वाटप व्हावे’, अशा खुलासा शंभूराज देसाई यांनी केला.
दरम्यान, विखे-पाटील यांनी परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मध्यस्थी केली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही नेत्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पाणी वाटपाचे योग्य नियोजन होईल आणि त्याप्रमाणेच आवर्तने सोडण्यात येतील. कुणीही पाणी सोडताना आडकाठी करू नये, असे विखे-पाटील यांनी बजावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.