Vishal Patil, Dr. Vishwajit Kadam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Loksabha 2024 : सांगलीची जागा सोडणार नाही! काँग्रेस ठाम; मुंबईत आज...

Anil Kadam

Sangli News : सांगली लोकसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे काँग्रेस भक्कमपणे उभी राहिली आहे. अपवाद वगळता सातत्याने काँग्रेसने विजय मिळविला आहे. त्यामुळे ती जागा काँग्रेसच लढणार आहे. अन्य पक्षाला जागा सोडू देणार नाही. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात शिवसेनेने विदर्भातील जागांच्या पर्यायावर चर्चा करावी. सांगली मतदारसंघ आम्ही सोडू शकत नाही, अशी भूमिका जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे. प्रदेश काँग्रेसची मंगळवारी (दि. 5) मुंबईत टिळक भवनला बैठक होत आहे. त्यामध्ये विश्वजीत कदम यांच्यासह नेते बाजू मांडणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) दीड-दोन वर्षांपासून जोरदार तयारी सुरू आहे. आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील सांगलीची लोकसभा निवडणूक लढणार आहेत. त्यांनी मोठ्या जनसंपर्कातून चांगली तयारी केली आहे. प्रदेश कमिटीसमोर यापूर्वी आम्ही हे मांडले आहे. सांगली (Sangli) मतदारसंघ हा काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ आहे. कोल्हापूर मतदारसंघातील लोकसभा घडामोडींसाठी सांगली काँग्रेसवर अन्याय होता कामा नये.

प्रदेश काँग्रेसची मंगळवारी मुंबईत टिळक भवनला बैठक होत आहे. त्यात राज्यातील गडचिरोली, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, रामटेक, नागपूर, अमरावती, अकोला, लातूर, जालना, धुळे, नंदूरबार, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे आणि भिवंडी या मतदारसंघांवर चर्चा होणार आहे. काँग्रेस (Congress) ने या निवडणुकीत सांगलीच्या जागेबाबत तडजोड करायची नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामागे 2019 ची पुनरावृत्ती होऊन वसंतदादा घराण्यावर अन्याय होता कामा नये, अशी भूमिका घेण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशाल पाटील (Vishal Patil) यांनी मतदारसंघात प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवली आहे. लढण्याची तयारी झाली आहे. अशावेळी वसंतदादा पाटील यांच्या नातवाला 'थांबा', असे सांगणे काँग्रेसला परवडणारे नाही, अशी भूमिका राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांनी मांडली आहे. त्याचवेळी जागा शिवसेनेला आणि उमेदवार विशाल, हा पर्यायदेखील अमान्य केला आहे. कारण त्यात विशाल पाटील यांनी स्पष्ट नकार दिला आहे.

ती चूक पुन्हा नको...

2019 मध्ये सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याची चूक झाली होती. या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही. ही जागा काँग्रेसनेच लढवली पाहिजे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. याबाबत मुंबईत आक्रमक भूमिका मांडली जाईल, असे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT