सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला विजयाची चांगली संधी चालून आली असताना 2019 प्रमाणे पुन्हा काँग्रेसची गोची करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीत सुरू झाला आहे. सांगली लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील पायाला भिंगरी लावून फिरत असताना राष्ट्रवादीने प्रतीक जयंतराव पाटील यांच्यासाठी गुगली टाकली. आघाडीमध्ये या दोन्ही पक्षाचा वाद सुरू असतानाच शिवसेनेने एन्ट्री केली. त्यामुळे महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा तिढा वाढला आहे. (Marathi News)
सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. अपवाद वगळता या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. गेल्या दहा वर्षांपासून लोकसभा मतदारसंघातून चित्र बदलले आहे. जिल्ह्यावर वर्चस्व गाजवलेले माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्या नातवांना दोन वेळा पराभूत व्हावे लागले आहे. यापूर्वी 35 वर्षे दादा घराण्यातील उमेदवाराने या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पण गेल्या दहा वर्षांमध्ये मतदारसंघावरील काँग्रेसची व दादा घराण्याची असलेली कमांड हळूहळू सैल होत चालली आहे. 2019 मध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांचा पराभव झाला, पण ते खचले नाहीत. पराभव पचणी पाडून पाच वर्षांपासून ते जनतेत कामाला लागले आहेत. जिल्ह्यातील विविध उपक्रम, सामाजिक कार्य व नेत्यांच्या गाठीभेठीवर त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून भर दिला आहे. त्याचा फायदा म्हणजे त्यांना सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे.
भाजप (BJP) विधिमंडळाच्या केंद्रीय पातळीवरील टीमने देशातील विविध मतदारसंघातील खासदारांच्या कामाचा आढावा घेतला होता. त्यांच्या टीममार्फत सर्व्हेदेखील केला होता. त्यामध्ये सांगलीची जागा धोक्याची दाखविली होती. शिवाय अनेक खासगी कंपनीमार्फतदेखील गेल्या वर्षीपासून सर्व्हे केला जात आहे. त्यामध्ये काँग्रेसला विजयाची संधी मिळेल, अशी आशा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. केवळ घोषणा होणे बाकी आहे. मात्र, अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीकडून गुगली टाकली गेली.
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांनी सांगली अथवा हातकणंगलेच्या जागेवर दावा केला आहे, पण सांगलीची जागा काँग्रेसची तर हातकणंगलेची शिवसेनेची. यामुळे राष्ट्रवादीची मोठी अडचण होत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा महिला मेळावा झाला होता. या वेळी जयंत पाटील यांनी प्रतीक पाटील यांना सांगली अथवा हातकणंगले मतदारसंघातून निवडून लढविण्याचा आग्रह कार्यकर्ते करत असल्याचे जाहीर सांगितले होते. तशी फिल्डिंगदेखील लावली जात आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या या वादात शिवसेनेने मात्र फायदा घेण्याची तयारी सुरू केली आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये जत, पलूस-कडेगाव हे दोन काँग्रेसकडे, सांगली व मिरज भारतीय जनता पार्टीकडे तर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार पक्षाकडे व खानापूर-आटपाडी मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे गट) वर्चस्व आहे. एकाही मतदारसंघात शिवसेना (Shivsena) (उबाठा) गटाचा विधानसभा सदस्य नाही. तसेच जिल्ह्यात काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादीचे अधिक वर्चस्व आहे. त्यामुळे विकास महाआघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसकडेच असणे आवश्यक असल्याचे मत काँग्रेस नेते व्यक्त करीत आहेत.
(Edited By-Ganesh Thombare)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.