Vishal Patil, Sanjaykaka Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Patil On SanjayKaka Patil : विशाल पाटलांच्या निशाण्यावर संजयकाका अन् संजय राऊत; म्हणाले...

Sangli Loksabha Election 2024 : शिवसेना व इतर मित्रपक्षांनी ही जागा मागणे स्वाभाविक आहे. पण सांगलीच्या जागेवरच का हट्ट केला जातो? यापाठीमागे कोणते षडयंत्र सुरू आहे...

Anil Kadam

Sangli News : भाजप व खासदारांनी सांगलीची जागा काँग्रेस पक्षाला मिळू नये म्हणून देव पाण्यात ठेवले आहेत. कोणाच्या आड बसून राजकारण करण्यापेक्षा तुम्ही पक्षाचे कवच बाजूला ठेवून मैदानात या, मी पण लंगोटा बांधून तयार आहे, तुम्हाला पुरून उरू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील यांना पत्रकार बैठकीत दिला. मुंबई मराठी माणसाची ताकद असावी म्हणून वसंतदादांचे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर स्नेह होते. पण दादा-ठाकरे कुटुंबीयांची सहानुभूती कमी होईल, असे वक्तव्य संजय राऊत यांनी करू नये, असे आवाहनही केले.

पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाने लोकसभेसाठी एकमेव माझे नाव पक्षाकडे दिले होते. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटप प्रक्रियेत जी चर्चा अपेक्षित नव्हती, ती चर्चा पुढे आली. तरीदेखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संयम राखला. मित्रपक्षांवर वादग्रस्त वक्तव्य केले नाही. मात्र, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत सांगलीत आल्यावर त्यांनी आमचे नेते आमदार विश्वजित कदम यांच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप केले. राऊतांना ही भाषा शोभणारी नाही. ते महाविकास आघाडीतील एक नेते आहेत. पुरोगामी मराठी नेतृत्वाचा चेहरा म्हणून त्यांना पाहिले जाते. भाजपविरोधी बोलणारे ते वक्ते आहेत. पण त्यांनी आमदार विश्वजित कदम यांच्यावर वैयक्तिक पातळीवर केलेले आरोप दुर्दैवी आहेत.

सांगली सुसंस्कृत आहे. त्यामुळे मुंबईची भाषा स्वीकारत नाहीत. आम्ही संयम पाळतो. भाजपनंतर वंचित आघाडी व आता शिवसेना असा पक्षप्रवेश करत असलेल्या उमेदवारासाठी इतके लढणे बरोबर नाही. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपविरोधी वातावरण काँग्रेस पक्षाने तयार केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपविरोधी लाट आहे. शिवसेना व इतर मित्रपक्षाने ही जागा मागणे स्वाभाविक आहे, पण सांगलीच्या जागेवरच का हट्ट केला जातो? यापाठीमागे कोणते षडयंत्र सुरू आहे. याच्या खोलात मी जात नसल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले, मला कधीही शिवसेनेने लढायची किंवा राज्यसभेची ऑफर दिली नाही. सर्वांना सोबत घेऊन निवडणुकीत उतरावे लागणार आहे. भाजपच्या पराभवासाठी हेवेदावेे विसरावे लागणार आहेत. आमदार विश्वजित कदम सांगलीची जागा मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना अपयश येणार नाही. सर्व काँग्रेस एकसंघ आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ही जागा काँग्रेसलाच मिळेल, याबाबत आम्ही सकारात्मक असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले.

तर खासदारांचा ज्योतिषी व महाराजांवर जास्त विश्वास आहे. काँग्रेसला उमेदवारी मिळू नये म्हणून त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. कोणाच्या तरी आड बसून राजकारण सुरू आहे. पण मला स्वत:च्या कर्तृत्वावर व जनतेवर विश्वास आहे. जनता साथ देतील, असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सांगलीच्या जागेचे षडयंत्र...

सांगली लोकसभेची जागा 16 वेळा काँग्रेसने जिंकली आहे. तरीदेखील शिवसेनेने कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगलीचाच हट्ट का केला? सातारा व सोलापूरची जागा का मागितली नाही. हातणकंणगलेत ‘मशाल’ चिन्ह असतानादेखील सांगली सोडणार नसल्याची भाषा वापरली जात आहे? यामध्ये संशयकल्लोळ निर्माण होत आहेत. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दोन दिवस वाया घालवून सांगलीचा चांगलाच अंदाज लावला आहे. त्यांचे मत परिवर्तन होणे अपेक्षित आहे आणि सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळेल, असा विश्वासही विशाल पाटील यांनी व्यक्त केला.

'सांगली मिळणारच; न मिळाल्यास...'

शिवसेनेने सर्व घटकांना सोबत घेऊन जाणे अपेक्षित होते. पण विश्वजित कदम यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. सांगली लोकसभेची जागा काँग्रेसच्या हक्काची आहे. ही जागा आम्हाला मिळणारच आहे. नाही मिळाली तर विचार करू, असे आमदार विक्रम सावंत यांनी स्पष्ट केले.

(Edited By Deepak Kulkarni)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT