Eknath Khadse News: खडसेंची हनुमान उडी...अडकली 'सीडी'

Raver Lok Sabha Election 2024: पक्षातील साडेतीन वर्षांच्या वास्तव्यात स्वतःसाठी आमदारकी आणि कन्या रोहिणी यांच्यासाठी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळवले आणि आता पुन्हा ते भारतीय जनता पक्षात हनुमान उडी मारत आहेत.
Eknath Khadse News
Eknath Khadse NewsSarkarnama
Published on
Updated on

विजय चोरमारे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षातील नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाचा सोहळा लवकरच होणार आहे. राज्यातल्या काही नेत्यांच्या विरोधानंतरही केंद्रीय नेतृत्व खडसेंना पक्षात घेण्यासाठी कसं राजी झालं याचं अनेकांना आश्चर्य वाटतंय.

खडसे यांनी भाजपमध्ये परत येण्यासाठी भाजपकडून दबाव वाढत असल्याचे ‘राष्ट्रवादी’च्या एका बड्या नेत्याने सांगितले. गेल्या महिन्यात दोन वेळा आपल्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोन आल्याचे खडसे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगितले होते. भाजपमध्ये परतण्यासाठी ते त्यावेळी पार्श्वभूमी तयार करीत असल्याचेच त्यावरून स्पष्ट होते. खडसे यांना भाजपमध्ये परत आणण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.

भाजपच्या एका बड्या नेत्याची कथित ‘सीडी’ आपल्याकडे असल्याचा दावा करत त्या ‘सीडी’ची शिडी करून एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले. पक्षातील साडेतीन वर्षांच्या वास्तव्यात स्वतःसाठी आमदारकी आणि कन्या रोहिणी यांच्यासाठी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळवले आणि आता पुन्हा ते भारतीय जनता पक्षात हनुमान उडी मारत आहेत.

Eknath Khadse News
Dharashiv Lok Sabha 2024: उस्मानाबादेत महायुतीला अपशकुन; राणा पाटील यांच्या नेतृत्वाला सावंतांचे आव्हान?

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील २०१४ मध्ये भाजपचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर त्या मंत्रिमंडळात खडसे यांच्याकडे महसूल खात्यासह अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी होती. खडसे हे गोपीनाथ मुंडे यांच्यानंतरचे महाराष्ट्र भाजपमधील महत्त्वाचे आणि जनाधार असलेले नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांना डावलून नवख्या फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिल्यामुळे ते नाराज होते आणि मंत्रिमंडळात असताना ते वारंवार नाराजी व्यक्त करीत होते. त्यातूनच त्यांच्याशी संबंधित वादग्रस्त प्रकरणे पुढे आली आणि त्यात त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

चार जून २०१६ रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच भाजपमधून ते बाजूला फेकले गेले. २०१९ला सत्तांतर झाल्यानंतर भाजपमध्ये असताना ते फडणवीस यांच्याविरोधात थेट बोलून आपले राजकीय अस्तित्व दाखवू लागले. भाजपच्या एका बड्या नेत्याची वादग्रस्त ‘सीडी’ आपल्याकडे असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येऊ लागला. भाजपकडून कोणत्याही पातळीवर दखल न घेतल्यामुळे ते पक्ष सोडण्याच्या निर्णयाप्रत पोहोचले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्नुषा रक्षा खडसे या भाजपच्या खासदार असल्या तरीही त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २३ ऑक्टोबर २०२० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात बोलण्यासाठी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसधील एकही नेता धजावत नव्हता. ही उणीव खडसे भरून काढतील, असे पक्षनेतृत्वाला वाटल्यामुळे खडसे यांचे राष्ट्रवादीमध्ये उत्साहाने स्वागत करण्यात आले.

जून २०२२ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीवेळी पक्षातील अनेक निष्ठावंत नेत्यांना डावलून खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामागे विधिमंडळात फडणवीस यांच्याशी सामना करण्यासाठीची त्यांची उपयुक्तता हाच उद्देश होता. विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात समावेशाचीही योजना होती. परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दिवशीच एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह सुरतला पलायन केले आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, त्यामुळे त्यांना ती संधी मिळाली नाही.

खडसेंचा पक्षाला उपयोग झाला नाही...

दरम्यानच्या काळात खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन खडसे कुटुंबीयांचा योग्य तो सन्मान केला. खानदेशातीलच आदिवासी क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका आक्रमक आणि जनाधार असलेल्या कार्यकर्तीला डावलून रोहिणी खडसे यांना संधी देण्यात आली. परंतु जसा खडसे यांचा पक्षाला काही उपयोग झाला नाही, तसाच रोहिणी खडसे यांचाही पक्षाला काही उपयोग झाला नसल्याचे पक्षातील नेते, कार्यकर्त्यांचे मत आहे.

रोहिणी खडसे पक्षाचे काम कसे करणार...

विद्या चव्हाण या महिला प्रदेशाध्यक्ष असताना वयाच्या मर्यादा असतानाही त्यांनी राज्यभर दौरा काढून पक्षसंघटना सक्रिय करण्याचा प्रयत्न केला होता. रोहिणी खडसे यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी मुंबई आणि रावेरच्या पलीकडे फारसे काही पाहिले नसल्याचे पक्षातील लोकांचे म्हणणे आहे. आता एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर रोहिणी खडसे यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु वडिलांसोबत सावलीसारख्या वावरणाऱ्या रोहिणी खडसे पक्षाचे काम कसे करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Eknath Khadse News
Thane Lok Sabha News: आनंद दिघेंनी गाडीतच जाहीर करून टाकले अन् ठाणे मतदारसंघ हिसकावून घेतला!

रावेरमधील अवस्था अगदीच नाजूक...

महाविकास आघाडीत वाटाघाटी करताना केवळ खडसे यांच्यासाठी शरद पवार यांनी रावेर मतदारसंघ आपल्या पक्षासाठी मागून घेतला. मात्र, रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि राष्ट्रवादीवर उमेदवार शोधाशोध करण्याची नामुष्की आली. आता खडसे भाजपमध्ये गेल्यामुळे राष्ट्रवादीची रावेरमधील अवस्था अगदीच नाजूक बनली आहे.

भाजपमध्ये परतीचे संकेत...

मुक्ताईनगर तालुक्यातील गौणखनिज प्रकरणी खडसे आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना १३७ कोटींचा दंड करण्यात आला होता, तो सरकारने रद्द केला. रक्षा खडसे यांच्याविरोधात लढणार नसल्याची एकनाथ खडसे यांनी घोषणा केली आणि मधल्या काळात त्यांचादिल्ली दौरा झाला. या सगळ्या घटना खडसे यांच्या भाजपमध्ये पुन्हा परतण्याच्या प्रक्रियेतील एकेक पायरी असल्याचे मानण्यात येते.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com