Lok Sabha Election 2024 : वाशीम-यवतमाळ, बुलडाण्यात शिवसेना, तर अमरावती, वर्ध्यात भाजपला टेन्शन!

Lok Sabha Election 2024 : बुलडाणा, वाशीम-यवतमाळ, अमरावती, अकोला या मतदारसंघांमध्ये सेना-भाजपचे वर्चस्व राहिले आहे. पण...
Devendra Fadnavis | Eknath Shinde
Devendra Fadnavis | Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

2019 च्या लोकसभा निवडणुकीत एकत्र लढलेले पक्ष 2024 च्या निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) कट्टर राजकीय दुश्मन झाले आहेत. गेल्या दीड वर्षांत महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे सूज्ञ मतदार निराश आणि संतप्त झाल्याचे दिसून येत आहे. पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसणार हे निश्चित मानले जात आहे.

गेल्या 25 वर्षांपासून पश्चिम विदर्भ हा शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचा गड मानला जात आहे. बुलडाणा, वाशीम-यवतमाळ, अमरावती, अकोला या मतदारसंघांमध्ये सेना-भाजपचे वर्चस्व राहिले आहे. पण, या वेळी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे वर्चस्व राहिल का एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बहुरंगी लढतीची बुलडाण्यात शक्यता!

राजमाता जिजाऊंच्या नावाने ओळखले जाणारे मातृतीर्थ बुलडाणा लोकसभा मतदारसंघात या वेळी थेटऐवजी बहुरंगी लढती होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यस्तरापासून स्थानिक ठिकाणापर्यंत सर्वच राजकीय समीकरणे बदलल्याने आजवर पारंपरिक काँग्रेस आणि शिवसेना अशी थेट लढत न होता, या वेळी दोन तुल्यबळ अपक्ष, वंचित बहुजन आघाडी या उमेदवारांमुळे ही बहुरंगी लढत अपेक्षित आहे.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून खासदार प्रतापराव जाधव ( Prataprao Jadhav ) यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर आघाडीच्या वतीने शिवसेनेच्या (उबाठा) गटाकडून प्रा. नरेंद्र खेडेकर ( Narendra Khedekar ) हे उमेदवार राहणार आहेत. स्पर्धेतील पहिल्या दोन उमेदवारांसोबतच खालोखाल मते घेणाऱ्या बहुजन वंचित आघाडीने या वेळी वसंतराव मगर यांना संधी दिली आहे. याशिवाय तुल्यबळ अपक्षांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर ( Ravikant Tupkar ) व बुलडाणा मिशनचे संदीप दादा शेळके हेदेखील उमेदवार राहणार आहेत. दरवेळेच्या निवडणुकीपेक्षा यावेळची लोकसभेची निवडणूक ही एका अर्थाने वेगळी राहणार आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असेल.

महाविकास आघाडी व दोन अपक्ष हे सर्वजण बहुसंख्येने असलेल्या मराठा-कुणबी समाजातून येतात. त्यामुळे चौघांमध्ये मत विभाजन होणार हे निश्चित आहे. परंतु, आता हे किती प्रमाणावर होते? यासाठी निकालाची वाट पाहावी लागणार आहे.

Devendra Fadnavis | Eknath Shinde
BJP Politics : जिथं लोकसभेत दिलेली उमेदवारी रद्द होते तिथं आमदारांचं कसं होणार? शिंदे गटात अस्वस्थता

वाशीम-यवतमाळात आता खरी परीक्षा मुख्यमंत्र्यांची

"ही लोकसभेची निवडणूक देशासाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणणे महायुतीतील सर्वच घटक पक्षांची जबाबदारी आहे," असे विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी येथील जाहीर सभेत केले. यवतमाळ-वाशीम लोकसभेची उमेदवारी ऐन वेळेवर जाहीर केल्याने व खासदार भावना गवळी यांची उमेदवारी कापल्याने आता खरी परीक्षा आहे ती राज्याचे मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री व घटक पक्षातील सर्व आमदारांची! उमेदवार फक्त परीक्षेला बसला आहे, अभ्यास महायुतीतील सर्व घटक पक्षांना करायचा आहे.

महायुतीत यवतमाळ-वाशीम हा लोकसभा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आला. गेली 25 वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व शिवसेनेच्या नेत्या, खासदार भावना गवळी ( Bhavana Gawali ) यांनी केले. त्यामुळे या मतदारसंघावर त्यांचा नैसर्गिक दावा होता. त्यांनी उमेदवारीसाठी अखेरच्या क्षणापर्यंत संघर्ष केला. पालकमंत्री संजय राठोड ( Sanjay Rathod ) यांनीही उमेदवारी मागितल्याने पक्षप्रमुखासमोर मोठा पेच निर्माण झाला. अखेर दोघांनाही उमेदवारी न देता पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील ( Rajashree Patil ) यांना ऐन वेळेवर उमेदवारी जाहीर केली. ही तारेवरची कसरत करीत असताना खासदार भावना गवळी बंड करणार नाही व पालकमंत्री पक्षाची धुरा खांद्यावर स्व:खुषीने घेतील, याची काळजी मुख्यमंत्री शिंदे यांना घ्यावी लागली.

खरेतर, खासदार गवळी यांना उमेदवारी मिळू नये म्हणून पक्षांतर्गत विरोध झाला, भाजपनेही ‘नो रिस्क’ म्हणत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. खासदार गवळी बंड करतील, असे वाटत होते, परंतु त्यांनी संयम ठेवला. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांची उमेदवारी आधीच जाहीर झाल्याने त्यांची प्रचाराची पहिली फेरी संपली आहे. येथे तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्र्वादी काँग्रेस यांची संघटनात्मक बांधणी मजबूत नसल्याने आणि महायुतीच्या राजश्री पाटील यांच्यासाठी जातीय समीकरण जमेची बाजू असल्याने सामना रंगतदार होणार हे निश्चित.

वर्धेत संघटन विरुद्ध गठबंधन

महाराष्ट्राच्या निर्मितीपासून वर्धा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. 2024 च्या लोकसभेत ही जागा पहिल्यांदाच महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला गेली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या गटाला जागा मिळविण्यात यश आले असले तरी उमेदवाराकरिता त्यांना चांगलेच भटकावे लागले. अखेर काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे ( Amar Kale ) यांना ऐनवेळी पक्षात घेत त्यांना उमेदवारी देण्यात आली. गत दोन लोकसभेपासून वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपची सत्ता आहे. या वेळी वर्धा लोकसभेत महायुतीचे उमेदवार रामदास तडस ( Ramdas Tadas ) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या थेट लागत आहे. सध्या मतदारसंघात महाविकास आघाडीबाबत पोषक वातावरण आहे. मात्र, संघटनात आघाडीवर असलेली भाजप वेळेवर फेरबदल करण्यात यशस्वी झाली आहे. यामुळे वर्धेत सध्या संघटन विरुद्ध गठबंधन अशी स्थिती आहे.

अमरावतीत बच्चू कडूंचा ‘प्रहार’ कुणावर?

अमरावती लोकसभा निवडणुकीत अनेक वर्षांनी भाजप व काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवार आमने-सामने आहेत. आजवर ही जागा महायुती किंवा महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या ताब्यात राहिली आहे. त्यामुळे टक्कर काट्याचीच होणार, हे स्पष्ट आहे. गेल्या निवडणुकीत ( 2019) काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अमरावती लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या खासदार नवनीत राणा यंदा भाजपच्या चिन्हावर रिंगणात आहेत. दुसरीकडे काँग्रेसने अनेक वर्षांनंतर ही जागा स्वतःच्या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेतल्याने आमदार बळवंत वानखडे मैदानात उतरले आहेत. दोन्ही पक्षांनी या मतदारसंघावर ताबा मिळविण्याच्या दृष्टीने चांगलाच जोर लावल्याने, तर आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने दिनेश बूब यांच्या रूपात उमेदवार दिल्याने महायुतीला वाटते तेवढी सोपी ही निवडणूक नसल्याचे जाणकारांचे मत आहे.

महायुतीच्या नवनीत राणा, महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे तसेच प्रहारचे दिनेश बूब यांच्यात खरी लढत होणार असल्याचे सध्याच्या स्थितीत मानले जात असले तरी सोमवारी (8 एप्रिल ) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर तसेच वंचित बहुजन आघाडी काय भूमिका घेतात, यावरसुद्धा राजकीय समीकरण अवलंबून राहणार आहे. रिपाइंचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनीसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचा विचार करणेदेखील तेवढेच महत्त्वाचे राहणार असल्याचे मानले जाते. प्रहार हा राज्यातील महायुतीतील घटक पक्ष आहे. परंतु, त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार दिला आहे. त्यांनी दिलेला उमेदवार हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तसेच महायुतीत एकाच वेळी फूट पडल्याचे चित्र आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

Devendra Fadnavis | Eknath Shinde
Baban Gholap News : बबन घोलपांचा प्रवेश शिंदे गटात, राजकीय लाभ मात्र अजित पवारांना होणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com