SanjayKaka Patil Vs Sanjay Raut Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

SanjayKaka Patil Vs Sanjay Raut : '...त्यामुळे तुमच्या प्रमाणपत्राची गरजच नाही'; संजयकाकांचा संजय राऊतांवर बाण!

Anil Kadam

Loksabha Election 2024 : लोकसभेच्या दोन टर्ममध्ये केलेल्या कामांवरच पक्षाने मला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याची टीका खासदार संजयकाका पाटील यांनी केली. 18 एप्रिलला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार पाटील म्हणाले, भाजप नेत्यांनी तिसर्‍यांदा माझ्यावर विश्वास दाखविला आहे. दुसर्‍या यादीतच माझी उमेदवारी जाहीर झाली आहे. केवळ निवडणुकीपुरतीच धामधूम करायची, अशी माझी प्रवृत्ती नाही. सातत्याने लोकांच्या संपर्कात राहिल्याने मला कोणतीही धावपळ करण्याची गरज नाही. राऊतांनी(Sanjay Raut) सांगलीत येऊन सलोख्याने प्रश्न सोडवायला हवे होते, मात्र त्यांनी जी भाषा वापरली, ती डिवचण्याची होती. त्यामुळे त्यांचा प्रश्न सुटेल, असे वाटत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संजय राऊत हे ठाकरे गटाचे प्रमुख नेते आहेत. राज्यस्तरावर काम करताना भान ठेवून बोलावे लागते. उचलली जीभ लावली टाळ्याला या भाषा सगळ्यांना करता येतात. जिल्ह्यात आल्यानंतर माझ्या कामाचे प्रगतिपुस्तक वाचले असते तर त्यांचे बोलायचे धाडस झाले नसते. राजकारणाची भाषा वापरण्यासाठी ते आले होते. मैदान सुरू झाल्यानंतर राऊतांना सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुराव्यासह दिली जातील. माझ्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी, तो माझा पक्ष आणि जनता आहे. माझे मूल्यमापन करण्यापेक्षा त्यांच्या पक्षातील नेत्यांचे मूल्यमापन करावे, असे प्रत्त्युत्तर संजयकाका पाटील(SanjayKaka Patil) यांनी दिले.

ताकारी, म्हैसाळ सिंचन योजनेसाठी चाकोरीच्या बाहेर जाऊन पैसे आणले. कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष असताना केंद्र सरकारने मोठी मदत केली. या निधीमुळे सांगली जिल्ह्यासह सातारा आणि सांगोला तालुक्यातील गावांना पाणी देता आले. लोकसभेसाठी सलग तिसर्‍यांदा 18 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले.

नरेंद्र मोदींची सांगलीत महिनाअखेरीस सभा -

निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर खर्‍या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे येणार आहेत. त्यानंतर सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या संयुक्त प्रचारासाठी एप्रिलअखेरीस सांगलीत जाहीर सभा होणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT