Sangli Loksabha : संजयकाका गटबाजीच्या कचाट्यात; काँग्रेसचे विशाल पाटील एकीच्या एक्स्प्रेसवर स्वार!

Vishal Patil-Sanjay Patil : भाजपत उमेदवारीवरून चुरस दिसत आहे. माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही लोकसभा उमेदवारीवर दावा केला आहे.
Vishal Patil-Sanjay Patil
Vishal Patil-Sanjay PatilSarkarnama

अनिल कदम

Sangli News : सांगलीत लोकसभा निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापू लागले आहे. सुरुवातीला शांत असणाऱ्या काँग्रेसनेही मैदानात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली. काँग्रेसकडून प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित समजली जात असून आपण मैदानातून पळ काढणार नसल्याचे स्पष्ट करीत त्यांनी लोकसभेसाठी शड्डू ठोकला आहे. सध्या काँग्रेसमध्ये एकी दिसून येत आहे. भाजपनेही सांगली लोकसभा मतदारसंघात नियोजनबद्ध बांधणी केली. पण, भाजपत उमेदवारीवरून चुरस दिसत आहे. माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही लोकसभा उमेदवारीवर दावा केला आहे, त्यामुळे खासदार संजय पाटील गटबाजीच्या कचाट्यात सापडले आहेत. (Vishal Patil's challenge to MP Sanjay Patil for Sangli Lok Sabha)

लोकसभा निवडणूक सर्वच पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याने सांगलीच्या जागेवर दावा केला जात आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीत सांगलीची जागा जिंकण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. गतवर्षी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी देशभर भारत जोडो यात्रा काढत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर काँग्रेसनेत्यांनी जनसंवाद पदयात्रा काढली होती. त्यात काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह नेते सहभागी झाले. पदयात्रेद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी लोकसभेसाठी काँग्रेसकडून विशाल पाटील यांना उमेदवारी मागितली आहे. पक्षाने त्यांना कामाला लागावे, अशा सूचना केल्या आहेत. त्यादृष्टीने त्यांच्याकडून जिल्हाभर तयारी सुरू असल्याचे दिसून येते.

Vishal Patil-Sanjay Patil
Solapur Politics : संघर्षाला कोण घाबरतंय...? म्हणत दिलीप मानेंनी रणशिंग फुंकले

भाजप खासदार संजय पाटील यांनी विशाल पाटील यांना आव्हान दिले होते. विशाल पाटील यांनी मैदानातून पळ काढला आहे, त्यांनी मैदानात येऊन लढावे, असे ललकारले आहे. त्यानंतर विशाल पाटील यांनीही खासदारांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. सांगलीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यालय सुरू करीत कामाला लागल्याचे दाखवून दिले. वसंतदादा पाटील यांच्या संस्कार आणि विचारांचे आम्ही आहोत, त्यामुळे पळ काढण्याचा किंवा भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही. लोकसभेची निवडणूक लढणार असून ती जिंकणारच आहे. देव-महाराजांच्या नावावर कारखाने दुप्पट करता येतात. पण, या निवडणुकीत खासदारांचा पराभव निश्चित आहे, असेही विशाल पाटील यांनी म्हटले आहे.

मागील काही वर्षांत काँग्रेसनेत्यांमध्ये मतभेद असल्याचे पाहायला मिळाले होते. एप्रिल 2023 मध्ये झालेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय चित्र काहीसे बदलले. त्यानंतर काँग्रेसमधील डॉ. पतंगराव कदम, वसंतदादा आणि मदनभाऊ गट एकत्र आला आहे, त्यामुळे काँग्रेसमध्ये एकवाक्यता दिसून येत आहे. जिल्ह्यात भाजपविरोधी वातावरण आहे, त्याचा लाभ उठविण्याची संधी काँग्रेसला आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने वाटचाल सुरू केल्याचे चित्र दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटही सोबत येईल, शिवाय उद्धव ठाकरे गटाची साथ मिळणार आहे.

Vishal Patil-Sanjay Patil
Shahajibapu News : शहाजीबापूंंनी गणपतआबांच्या नातवाला ललकारले; आजोबाला जे जमलं नाय, ते नातवाला काय जमायचं?

सांगलीत खासदार संजय पाटील यांच्या कामकाजाबाबत चर्चाही जोरदार सुरू आहे. भाजप पक्षांतर्गत सुरू असलेली गटबाजी थांबायला तयार नाही. खासदार संजय पाटील आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात अनेक कारणांवरून वाद उफाळून येतात. पाटील यांना पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हेच आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. केवळ उमेदवारी मागत नसून पक्षाने संधी दिल्यास जिल्ह्याचे व्हिजन घेऊन निवडणूक ताकदीने लढविली जाईल, अशी भूमिका देशमुख यांनी मांडली आहे. विमानतळ आणि ड्रायपोर्ट हे जिल्ह्याच्या विकासाचे केंद्र आहे, त्यादृष्टीने कामे होणे गरजेचे होते, परंतु दोन्ही कामे झाली नसल्याची खंत व्यक्त करीत देशमुख यांनी अपयशाचे खापर खासदारांवर फोडले.

Vishal Patil-Sanjay Patil
Ajit Pawar News: यशवंतराव चव्हाण सेंटरवर आता अजितदादांचा डोळा?

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय पाटील आणि माजी जिल्हाध्यक्ष देशमुख वेगवेगळ्या बैठका घेत आहेत. पक्षाच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांच्या ते भेटी घेत आहेत. देशमुख यांचा संपर्क वाढत आहे. माजी आमदार विलासराव जगताप आणि संजय पाटील यांच्यातही मतभेद आहेत. त्यामुळे जगताप गट खासदाराविरोधात आक्रमक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्याशी यशवंत कारखान्यावरून वाद आहे.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याशी खासदारांचे चांगलेच सूर जुळल्याचे दिसून येते. या परिस्थितीत देशमुखांनी लोकसभेवर दावेदारी केल्यास भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. देशमुख यांना गेल्यावेळी थांबा, पुढे विचार करू, असे मागील 2019 च्या निवडणुकीवेळी सांगण्यात आले होते. काँग्रेसमध्ये एकीचा नारा दिला जात असताना भाजपमध्ये खासदाराविरोधात असंतोष वाढताना दिसत आहे.

Vishal Patil-Sanjay Patil
Solapur Mahayuti Melava : हेवेदावे बाजूला ठेवून महायुतीच्या विजयाची वज्रमूठ बांधा : चंद्रकांतदादांचे आवाहन

खासदांराची उमेदवारी थोपविणे भाजपच्या नेत्यांपुढे आव्हान असणार आहे. तसे झाल्यास संजय पाटलांची नाराजी पक्षाकडून कशी काढली जाणार? असा प्रश्न आहे. मागील काही महिने जिल्ह्यातील भाजपची गाडी सुसाट होती, परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर खासदार संजयकाका गटबाजीच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना निवडणुकीत पक्षातील मतभेद मिटवून बंड थोपवावे लागणार आहे.

अजितदादा गटाच्या फुटीने काँग्रेससोबत राष्ट्रवादी किती?

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससोबत राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट आहे. जिल्ह्यात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. परंतु काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतील अजितदादा गट फुटला. त्याचा परिणाम जिल्ह्यातही होऊ लागला. राष्ट्रवादीतील माजी पदाधिकाऱ्यांसह सांगली, मिरज महापालिकेच्या माजी नगरसेवकांनी अजितदादा गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. अजितदादा गटाकडून जयंत पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न दिसतो आहे, त्यामुळे अजितदादा गटाच्या फुटीमुळे काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस किती राहणार, अशीही चर्चा रंगली आहे.

Edited By : Vijay Dudhale

R...

Vishal Patil-Sanjay Patil
Solapur Siddheshwar Yatra : सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेत बाराबंदी पोशाखात राजकीय नेत्यांची हजेरी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com