Sangli News, 16 Jun : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील हमाल नेते तथा सांगली बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर हत्या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून पोलिसांनी निलेश गडदे याला अटक केली आहे.
दरम्यान, गडदे याने वेदांतच्या हत्येच्या आदल्या दिवशीच एका ठिकाणी गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आदल्या दिवशीच्या गोळीबाराच्या घटनेकडे गांभीर्याने लक्ष दिले असते तर वेदांतचा जीव वाचू शकला असता, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अशातच सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनीही पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.
वेदांत बंडगर हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खासदार विशाल पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, जिल्ह्यात वर्षाच्या सुरुवातीपासूनच खुनांच्या घटनांची मालिका सुरू असून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास ढासळत चालला आहे.
"सांगलीतील अनेक खुनांच्या घटनांमध्ये एक ठराविक पद्धत दिसून येते. अल्पवयीन मुलांना पुढे करून गुन्हे घडवले जातात आणि त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली दिली जाते. अशा मुलांना गुन्ह्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करणारे एक रॅकेट कार्यरत असून त्यातून पैशांचा मोठा व्यवहार सुरू आहे," असा गंभीर आरोप पाटील यांनी केला.
विशाल पाटील यांनी पोलिस विभागातील भ्रष्टाचाराचाही मुद्दा उपस्थित केला. "वरपासून खालपर्यंत भ्रष्ट कारभार सुरू आहे. पैशांच्या जोरावर बदल्या केल्या जातात. कोट्यवधी रुपये खर्च करून अधिकारी पदांवर येतात, मग ते कायदा व सुव्यवस्था कशी राखणार?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात वसुलीसाठी स्वतंत्र कर्मचारी कार्यरत असल्याचाही आरोप त्यांनी केला. वेदांत बंडगर यांची हत्या झालेल्या दिवशी संबंधित पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना कोणकोणाचे फोन आले होते, याची माहिती जनतेसमोर आणावी, अशी मागणीही त्यांनी केली.
तर वेदांतचा खून झाला त्या दिवशी तिथल्या पोलीस निरीक्षक आणि उपाधीक्षकांना कोणी कोणी फोन केले हे जनतेपुढे आले पाहिजे. हा आरोपी लोकसभेला कोणाचे आणि कोणत्या पक्षाचे काम करत होता हे जगजाहीर आहे, असा मोठा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे पाटील यांच्या आरोपांमुळे आता सांगली पोलिसांच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, खासदार विशाल पाटील यांच्या आरोपांमुळे सांगली जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या आरोपांवर पोलिस प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.