Sangli Vedant Bandgar Death Sparks Outrage as Authorities Investigate sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Murder Case : सांगली हादरली! हमाल ठेक्याच्या वादातून घरात घुसून गोळीबार, हमाल नेत्याच्या नातवाचा निर्घृण खून; निष्पाप मुलाच्या हत्येने खळबळ

Sangli Hamal Contract Dispute : बाळासाहेब बंडगर हे हमालांचे नेते असून हमाल गटातून २००७ ते २००८ बाजार समितीत संचालक झाले होते. तर सध्या त्यांचे चिरंजीव मारुती बंडगर हे संचालक आहेत.

शैलेश पेटकर

Sangli News : शैलेश पेटकर

हमाल नेते, सांगली बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर यांच्या नातवाचा घरात घुसून गोळ्या घालून आज निर्घृण खून करण्यात आला. हमाल ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंड नीलेश गडदे याने साथीदारांसह हे कृत्य केले. वेदांत मारुती बंडगर (वय १४) असे मृत मुलाचे नाव आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अभयनगर एसटी कॉलनीत ही घटना घडली. एका निष्पाप मुलाचा संशयितांनी गोळी झाडून खून केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, गडदे याने २०२० मध्ये कुपवाडमधील कामगार नेते दत्ता पाटोळे यांचा खून केला होता. त्यातून त्याची जामिनावर सुटका झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून दोन गटांत काही दिवसांपासून वाद सुरू आहे.

या कामाचा ठेका सध्या लक्ष्मण पांडुरंग खरात यांच्याकडे आहे. खरात यांनी हे काम सोडावे म्हणून संशयित नीलेश गडदे (मूळ रा. हमालवाडी, सध्या रा. कुंभारी, ता. जत) याने दबाव आणला होता. काल सायंकाळी सातच्या सुमारास गडदे हा दोन साथीदारांसह खरात यांच्या घरात गेला. खरात घरात नसल्यामुळे त्यांचे पत्नीला धमकावले. खंडणीही मागितली. खरात यांच्या घरात घुसून धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर हे जत येथे गेले. गडदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल मोठ्या संख्येने गोळा झाले होते.

दुपारी साडेबाराच्या सुमारास पोलिस ठाणे परिसरात दोन गट समोरासमोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. तेव्हा संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या चारचाकीवर दगडफेक केली. त्यामुळे गडदे चिडला होता. आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बंडगर यांच्या बंगल्यासमोर आल्यानंतर गडदे हा चारचाकीतून खाली उतरला. गडदे याने बाळासाहेब बंडगर यांचे घर हेच का, असे बाळासाहेबांच्या भावाला विचारले. त्यानंतर गडदे याने पिस्तूल काढत दहशत माजवली.

बंडगर यांचे भाऊ बंगल्याच्या मागील बाजूला पळाले. त्यावेळी बंगल्याच्या पोर्चमध्ये नातू वेदांत हा मोबाईल बघत होता. गडदे याने वेदांतवर पिस्तूल रोखून त्याच्या उजव्या डोळ्यांत गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून बंडगर यांच्या घरातील महिला बाहेर आल्या. तोपर्यंत गडदे हा साथीदारांबरोबर निघून गेला.

संपवायचं होतं बंडगरांना

बाळासाहेब बंडगर हे हमालांचे नेते असल्याने जतमध्ये गेले होते. त्यामुळे चिडलेला गडदे हा बाळासाहेबांना संपवण्यासाठी सांगलीत आला होता, मात्र त्यांच्या आजोबांचा राग त्या निष्पाप वेदांतवर काढण्यात आला. कुटुंबीयांचा त्याच्यावर लळा होता. त्याच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

सांगली बंदी असताना कृत्य

कुपवाडमधील राष्ट्रवादीचा युवक जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटोळे यांचा जुलै २०२० मध्ये निर्घृण खून झाला होता. या खुनातील मुख्य संशयित नीलेश गडदे हा आहे. या खून प्रकरणात तो काही दिवसांपूर्वी जामिनावर मुक्त झाला होता. त्याला महापालिका क्षेत्रात प्रवेश बंदी होती, तरीही त्याने हे कृत्य केले आहे.

हमाल ते संचालक

बाळासाहेब बंडगर हे हमाल गटातून २००७ ते २००८ बाजार समितीत संचालक झाले. तेथून त्यांच्या प्रवास हमाल ते हमाल नेता असा सुरू झाला. हमालासाठी अनेक चांगली कामे त्यांनी केली आहेत. त्यामुळेच त्यांना हमालांची साथ नेहमीच राहिली. सध्या त्यांचे चिरंजीव मारुती बंडगर हे संचालक आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT