

पुण्यात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका विद्यार्थ्याने आपल्या वर्गमित्राची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आंबेगाव तालुक्यातील एका आयटीआय संस्थेत घडली असून, किरकोळ वादातून ही रक्तरंजित घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मृत विद्यार्थ्याचे नाव सौरभ संतोष साखरे (23) असे असून तो आणि आरोपी शुभम कदम हे दोघेही एकाच वर्गात शिक्षण घेत होते. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये एका क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. हा वाद मनात धरून आरोपीने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे येत आहे.
गुरुवारी रात्री सौरभ हा आयटीआयच्या इमारतीच्या टेरेसवर झोपला होता. मध्यरात्रीच्या सुमारास शुभम तेथे पोहोचला. त्याने झोपलेल्या सौरभवर अचानक हल्ला चढवत धारदार चाकूने अनेक वार केले. या हल्ल्यात सौरभ गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरू केला. यानंतर आरोपी शुभम कदम याला अटक करण्यात आली. सध्या त्याची सखोल चौकशी सुरू असून नेमका वाद कशामुळे झाला होता, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
मित्रानेच मित्राचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिक्षण घेत असलेल्या तरुणांमध्ये वाढणारी आक्रमकता आणि छोट्या कारणांवरून हिंसक मार्ग स्वीकारण्याची प्रवृत्ती याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. महाविद्यालयीन आणि तांत्रिक शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत अधिक जागरूकता आणि समुपदेशनाची गरज असल्याची चर्चा या घटनेनंतर पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास घोडेगाव पोलीस करत असून, तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.