Sangli Politics : सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत राजकारण उफाळून आले आहे. अशातच भाजपवर नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर लावत खळबळ उडवून दिली आहे.
जिल्हा परिषद सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईत पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत जिल्ह्यातील नेत्यांची चर्चा अपेक्षित होती. मात्र जिल्ह्यातील एकाही नेत्याने या बैठकीला उपस्थिती लावली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद सत्तास्थापनेचे समीकरण आता नव्या वळणावर येण्याची चिन्हे आहेत.
सांगली जिल्हा परिषदेवर महायुतीकडे काठावरच बहुमत आहे. भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घ्यावी लागणार आहे. मात्र भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्याची तयारी असल्याने गुप्त बैठकांवर जोर सुरू होता. त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला एकही पदाधिकारी उपस्थित राहिला नाही.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत संघर्ष देखील उफाळून आला आहे. व्हीपचे अधिकार जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आपल्याकडे ठेवल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या गटनेतेपदी राजेश्वरी रणधीर नाईक यांची निवड करण्यात आली आहे. गट नोंदणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. मात्र दोन वेळा यात त्रुटी दाखवून ही नोंदणी टाळण्यात आली.
त्यावरून माजी आमदार विक्रम जगताप यांनी थेट प्रशासनावर आरोप केलेत. पक्षाच्या गटनोंदणीला जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. गटनेतेपदाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी सर्व सदस्य, पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. त्यावेळी प्रशासनाकडून तांत्रिक त्रुटी दाखवून अर्ज परत करण्यात आला. सांगितलेली चूक दुरुस्त करून आज पुन्हा अर्ज सादर करण्यात आला, मात्र त्यामध्येही त्रुटी काढण्यात आल्या.
दिवसभर सदस्य, पदाधिकारी कार्यालयात थांबूनही गटनोंदणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातून पक्षाचे सदस्य उशिरा निघून गेले. प्रशासनावर कोणाचा तरी दबाव असल्यानेच ही प्रक्रिया लांबवली जात आहे, असे आम्हाला वाटते. प्रशासनाने कोणच्याही दबावाखाली न येता कायद्याच्या चौकटीत निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षात 'व्हीप'च्या अधिकारावरूनही दोन दिवसांपूर्वी नाट्यमय घडामोडी घडल्या. गटनेत्याकडे 'व्हीप'चे अधिकार असणे आवश्यक असताना ते जिल्हाध्यक्षांनी स्वतःकडे घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर नेत्यांमधील चर्चेनंतर 'व्हीप'बाबतचे पत्र नव्याने देण्यात आले, तरीही आज रात्रीपर्यंत गटस्थापनेची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.