Kagal Zilla Parishad Elections Politics; sanjay mandlik, hasan mushrif samarjeet ghatge and sanjay ghatge  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kagal Politics : मुश्रीफांनी पुन्हा एकदा मंडलिकांना आस्मान दाखवलं, दोन्ही घाटगेंची गट्टी करत जिपची गणितचं फिरवली

Sanjay Mandlik Zilla Parishad Elections Politics : राज्यातील महानगरपालिकांचा निकाल लागला असून आता आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

Aslam Shanedivan

  • जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला.

  • संजय घाटगे आणि समरजितसिंह घाटगे यांची युती निश्चित झाल्याने संजय मंडलिक एकाकी लढतीकडे वळले.

  • रविवारी झालेल्या बैठकीनंतर कागलमधील राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला.

kolhapur News : रमेश पाटील

जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आता कागल तालुक्यात राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. पक्षाच्या म्होरक्यांनी भेटीगाठी आणि राजकीय समीकरणांच्या जुळवाजुळवीकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. अशातच मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्या युतीला शह देण्यासाठी माजी खासदार संजय मंडलिक यांच्या कुटनितीलाच आता ब्रेक लागला आहे. तर संजय घाटगे यांना घेऊन निवडणुकीत उतरण्याच्या मंडलिक यांचे मनसुबे उधळले आहेत. मंत्री मुश्रीफ संजय घाटगे, समरजितसिंह घाटगे यांची युती झाली आहे. ज्यामुळे आता जिल्ह्यात महायुती असूनही तालुक्यात युती नसल्याचे चित्र निर्माण झाले असून संजय मंडलिकांना या युतीविरोधात एकाकी झुंज द्यावी लागणार आहे.

नगरपालिका निवडणुकीनंतर लगेचच होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ, संजय घाटगे, समरजितसिंह घाटगे अशा तिघांच्या युतीसमोर माजी खासदार संजय मंडलिक महायुतीचे घटक असूनही एकाकी पडले आहेत. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा जागा, तर पंचायत समितीच्या बारा जागा आहेत. त्यामध्ये महायुतीच्या वाटाघाटीत जिल्हा परिषदेच्या मुश्रीफ यांना तीन, संजय घाटगे यांना दोन, तर समरजितसिंह घाटगे यांना एक जागा मिळाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

तर पंचायत समितीच्या प्रत्येकी चार जागा घेतल्या आहेत. जोरदार शक्तिप्रदर्शन करत मेळाव्यामधून संजय घाटगे गटाने जिल्हा परिषदेच्या दोन व पंचायत समितीच्या पाच जागांसाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते. प्रत्यक्षात त्यांनी जिल्हा परिषदेच्या दोन व पंचायत समितीच्या चार जागा घेतल्या आहेत. मेळावा घेऊन दबाव तंत्राचा प्रयोग झाला. तालुक्यात मोठा गट असणाऱ्या मुश्रीफांना दोन्ही घाटगेंना सांभाळताना ताकद असूनही कमी जागा घ्याव्या लागल्या. गत पंचायत समितीत मुश्रीफांच्या सहा जागा निवडून आल्या होत्या. आता युतीच्या तडजोडीत त्यांना चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.

कागल नगरपालिकेच्या सत्तेत मुश्रीफांसोबत असलेल्या समरजितसिंह घाटगे यांनी शाहू आघाडीकडून उमेदवार उभे केले होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते आपले उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढवणार आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाची आता औपचारिकता राहिली आहे. मंत्री मुश्रीफ, दोन घाटगे यांच्या युतीच्या विरोधात महायुतीचा घटक असणाऱ्या संजय मंडलिकांना एकट्यानेच लढत द्यावी लागेल, अशी शक्यता होतीच. यामुळे मंडलिकांनी जिल्हा परिषदेच्या गटनिहाय कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन निवडणुकीचे रणशिंग यापूर्वीच फुंकले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपद खुला महिला असे आरक्षित झाले आहे. परिणामी, आरक्षित असलेल्या बोरवडे, नानीबाई चिखली, सेनापती कापशी या गटांना महत्त्व आले असून, येथील लढती लक्षवेधी होतील. संजय मंडलिक यांनीही तालुक्यातील सर्वच्या सर्व जागा लढवण्याची तयारी केली आहे.

दृष्टिक्षेपात तालुक्यात एकूण मतदान केंद्रे - २३१

एकूण मतदान - १ लाख ९६ हजार २९८ इतर मतदान - २

पुरुष मतदार ९९ हजार ३१

महिला मतदार ९७ हजार २६५

कागल तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांपैकी पाच मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाले आहेत, तर एकमेव म्हाकवे जिल्हा परिषद मतदारसंघातून ओबीसी पुरुषाला संधी आहे. मुश्रीफ व दोन्ही घाटगे एकत्र आल्याने त्यांच्याकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे, तर संजय मंडलिक या गटातील नाराज कार्यकर्त्यांबरोबर इंडिया आघाडीतील कार्यकर्त्यांनाही सोबत घेण्याची शक्यता आहे.

जागावाटपाचा फॉर्म्युला

मंत्री मुश्रीफ, संजय घाटगे, समरजितसिंह घाटगे यांची युती. जागा वाटपही निश्चित. मुश्रीफ गटाला जिल्हा परिषदेच्या तीन जागा. (बोरवडे, सेनापती कापशी, कसबा सांगाव). पंचायत समितीच्या चार जागा (सावर्डे बुद्रुक, नानीबाई चिखली, यमगे, कसबा सांगाव)

संजय घाटगे गटाला जिल्हा परिषदेच्या दोन जागा (म्हाकवे, सिद्धनेर्ली), तर पंचायत समितीच्या चार जागा (साके, माद्याळ, हळदी, सेनापती कापशी)

समरजितसिंह घाटगे गटाला जिल्हा परिषदेची एक जागा (नानीबाई चिखली), तर पंचायती समितीच्या चार जागा (म्हाकवे, सिद्धनेर्ली, बोरवडे, मौजे सांगाव) अशा पद्धतीने जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामध्ये पंचायत समितीच्या जागेत अदलाबदल होऊ शकते

२०१७ चे जिल्हा परिषद बलाबल

एकूण - ५ सदस्य

मुश्रीफ गट - ३ सदस्य : बोरवडे, सेनापती कापशी, कसबा सांगाव

मंडलिक गट - १ सदस्य : नानीबाई चिखली

संजय घाटगे गट- १ सदस्य : सिद्धनेर्ली

पंचायत समितीतील २०१७ चे बलाबल

एकूण - १० सदस्य

मुश्रीफ गट (राष्ट्रवादी काँग्रेस) - ६ सदस्य : बोरवडे, सेनापती कापशी, कसबा सांगाव, पिंपळगाव खुर्द, सावर्डे बुद्रुक, माद्याळ.

मंडलिक गट (शिवसेना) - ३ सदस्य : नानीबाई चिखली, यमगे, सिद्धनेर्ली.संजय घाटगे गट (शिवसेना) - १ सदस्य : म्हाकवे.

FAQs :

1) कागल तालुक्यात राजकीय समीकरणे का बदलली?
संजय घाटगे आणि समरजितसिंह घाटगे यांची युती निश्चित झाल्यामुळे राजकीय समीकरणे बदलली.

2) संजय मंडलिक यांची भूमिका काय असणार आहे?
सध्याच्या परिस्थितीत त्यांना एकाकी झुंज द्यावी लागण्याची शक्यता आहे.

3) कोणत्या निवडणुकीसाठी ही घडामोड आहे?
जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजकीय हालचाली घडत आहेत.

4) चर्चांना पूर्णविराम कधी मिळाला?
रविवारी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर चर्चांना पूर्णविराम मिळाला.

5) कागल तालुक्याचे राजकारण कशासाठी ओळखले जाते?
प्रत्येक निवडणुकीत अनपेक्षितपणे बदलणाऱ्या राजकीय समीकरणांसाठी कागल तालुक्याचे राजकारण ओळखले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT