Sanjay Raut News : मागील काही काळापासून सातत्याने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे. कोणत्या नेत्याला संधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार, यावर देखील बोलले जात आहे. मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराला ब्रेक लागल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
ते म्हणाले, "पंतप्रधान मोदी यांना मंत्रिमंडळात फेरबदल करायचे आहेत. पण ते करू शकत नाहीत. त्यामुळे भाजप आणि त्यांच्या सरकारमध्ये अंतर्गत बंडाळ्या सुरू असून, चार वरिष्ठ मंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे.'
पुढे बोलताना ते म्हणाले की, 'या चार मंत्र्यांनी मोदींच्या मंत्रिबदलाच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही, आधी अमित शहांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे फेरबदल अद्याप झालेला नाही, आणि होऊही शकणार नाही."
'केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करून उपपंतप्रधान पदाची निर्मिती करावी. त्या पदावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचा माणूस नियुक्त करावा, जो पंतप्रधानपदाचा पुढील वारसदार असेल, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे. या भूमिकेत अमित शहा बसत नाहीत. त्यामुळे त्यांचा खेळ संपलेला आहे.', असेही राऊत यांनी सांगितले.
पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार याबाबतच्या चर्चांवर विचारले असता ते म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होत असतील तर मराठी माणूस होईल यामध्ये आम्हाला आनंद आहे. राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता जास्त वाटत आहे. सध्या देवेंद्र फडणवीस दिल्लीला रोज का जातात. दिल्लीत जाऊन काय चर्चा करतात हे मला चांगले माहिती आहे.'
दळणवळणाच्या सुविधा आणि वाढलेल्या जीडीपीवर भाजप नेत्यांकडून दावे करण्यात येत आहेत. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, जीडीपीत बदल सांगणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे ते कोल्हापूर प्रवास करावा. त्यांना समजेल रस्त्यांची काय अवस्था आहे? काल नवी मुंबई ते कोल्हापूर प्रवास विमानाने केला, त्यालाच अडीच तास लागले. भाजपवाल्यांवर तुम्ही विश्वास का ठेवता? असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी पत्रकारांना केला.
राऊत म्हणाले, अमित शहा हे मिंधे पक्षाचे प्रमुख आहेत. आमचे पक्षप्रमुख हे बाळासाहेब ठाकरे होते. त्यामुळे दिल्लीतील नेते देखील मातोश्रीवर येत होते. महाराष्ट्रातील दोन पक्षाची स्थापना अमित शहा यांनी केली.अजित पवारांचा राष्ट्रवादीचा गट आणि मिंधे गट अशा दोन पक्षांची त्यांनी केली. अमित शहांचे आदेश ऐकण्यासाठी त्यांना दिल्लीत जावे लागते, असा टोलाही राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचे राजकारण सरकार करते. मागील आंदोलनातील श्रेय घेणारे आता कुठे आहेत? राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत यांना पाठवून प्रश्न सुटणार आहेत का? हा सामाजिक आणि आर्थिक विषय आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांना बोलावून त्यावर सर्व समावेशक मार्ग मुख्यमंत्र्यांनी काढावा लागेल. मात्र मुख्यमंत्र्यांना इतकी अक्कल आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.