

Chhatrapati Sambhajinagar News, 04 Sep : मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा एकूण निधी 46 हजार 579 कोटी रुपये आहे. मात्र, त्यापैकी केवळ 3 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक विकास प्रकल्प अद्याप कागदावरच असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.
मराठवाड्यातील रखडलेले विकास प्रकल्प, दुष्काळाचा प्रश्न आणि सरकारने जाहीर केलेल्या विकासकामांच्या योजनांची सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. ‘विकासाला विलंब म्हणजे विकासाला नकार’ या कार्यक्रमांतर्गत मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर छत्रपती संभाजीनगर येथे चर्चा करण्यात आली.
यावेळी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. मराठवाड्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मागील दोन बैठकींमध्ये करण्यात आलेल्या घोषणा आणि त्यांची सध्याची प्रत्यक्ष स्थिती याचा आढावा घेणारे सादरीकरण आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केले.
सरकारने मराठवाड्याच्या विकासप्रश्नावर श्वेतपत्रिका काढली, तर ती कोरा कागदच असेल, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. तसेच अभिजीत दिपके यांच्या शाळा तपासणी मोहिमेचे त्यांनी कौतुक केले. अशा प्रकारे तपासणी करायला काय हरकत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नांवर सरकारच्या कामातील त्रुटी आणि उणिवा दाखवण्यासाठी ‘विकासाला विलंब म्हणजे विकासाला नकार’ हे आंदोलन केले जाईल, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला. दरम्यान, प्रत्येक प्रकल्पाचा हिशोब द्यावा लागेल, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. मराठवाड्यातील विकासकामांच्या 780 विषयांची यादी करण्यात आली असून, प्रत्येक जिल्ह्यात किमान दहा प्रकल्प तरी पूर्ण होतील, यासाठी आम्ही आग्रही राहू, असे दानवे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.