सोलापूर : उत्तर सोलापूर (solapur) तालुक्यातील पाथरी गावातील एका शेततळ्यात शुक्रवारी (ता. २१ जानेवारी) आईसह दोन मुलींचा मृतदेह आढळून आला होता. त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्या घटनेला आता वेगळे वळण लागले आहे. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी आपल्या मुलीचा बळी घेतल्याचा आरोप मृत सारिका अक्षय ढेकळे यांची आई लक्ष्मी सुरवसे यांनी केला आहे. (Sarika Dhekale commits suicide with her two daughters)
लक्ष्मी सुरवसे यांच्या फिर्यादीनुसार दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, तर सारिका हिचा पती अक्षय ढेकळे, सासरा उत्तम मच्छिंद्र ढेकळे आणि दीर अण्णासाहेब उत्तम ढेकळे (सर्वजण रा. पाथरी, ता. उत्तर सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक अरूण फुगे यांनी याबाबतची माहिती दिली.
सारिका आणि अक्षय यांचा 2017 मध्ये विवाह झाला होता. विवाहात मानपान केला नाही, चांगला आहेर केला नाही, सोने दिले नाही, याचा राग मनात धरून पतीसह कुटुंबातील व्यक्तींकडून सारिकाचा अपमान करण्यात येत होता. तसेच दोन मुलीच झाल्यानेही तिला त्रास दिला जात होता. नवीन कपडे घेऊ न देणे, उपाशी ठेवणे, माहेरी न पाठविणे, फोनवर माहेरी बोलू न देणे आदी बाबींना कंटाळून सारिका हिने तिच्या दोन्ही मुलींसह आपले जीवन संपवले होते.
सारिकाचा पती अक्षय याने ‘शेतात पाखरे राखायला गेल्यानंतर पत्नीचा पाय घसरून शेततळ्यात पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्या तिघींचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने सखोल तपास सुरू केला होता. सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक डी. एस. दळवी यांनी त्यासंबंधीची चौकशी केली. तत्पूर्वी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली होती.
सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे. त्यानंतर मयताचा पती अक्षय उर्फ आकाश ढेकळे, सासरा उत्तम मच्छिंद्र ढेकळे, अनिता उत्तम ढेकळे, अण्णासाहेब उत्तम ढेकळे, पूजा अण्णासाहेब ढेकळे, विलास सुरवसे, सोजरबाई विलास सुरवसे, साळुबाई बाळा गुंड, बाळा गुंड आणि छकुली यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.
आई गेल्यानंतर काही वेळातच सारिकाने केली आत्महत्या
सारिका ढेकळे यांना दोन मुलीच झाल्याने सासरच्यांनी त्यांचा छळ सुरु केला होता, ही माहिती समोर आली आहे सारिकाची आई त्यांचा कौटुंबिक वाद मिटवायला शुक्रवारी (ता. 21 जानेवारी) मुलीच्या सासरी गेल्या होत्या. त्या त्यांच्या गावी गेल्यानंतर काही वेळातच सारिकाने दोन्ही मुलींसह आत्महत्या केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.