Satara News, 05 Oct : क्षणाचा राग एखाद्याचे आयुष्य कसे उद्ध्वस्त करू शकतो, याचे एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. टीव्ही बंद करणे आणि मोबाईलच्या वापरावरून झालेल्या घरगुती वादातून शिक्षक पित्याने चक्क आपल्या मुलीची हत्या केल्याची भयानक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे.
आर्या पुरुषोत्तम कदम (वय १७) असे मृत मुलीचे नाव आहे. या हत्येप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी आरोपी पिता पुरुषोत्तम संपत कदम याला अटक केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, मूळचे चंचळी (ता. कोरेगाव) येथील रहिवासी असलेले पुरुषोत्तम कदम आणि त्यांची पत्नी शीला हे दोघेही पेशाने शिक्षक आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय आर्याला चुकीच्या संगतीमुळे उद्धट वर्तनाची सवय लागली होती. कौटुंबिक वाद टाळण्यासाठी पालकांनी तिचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन तसेच वैद्यकीय उपचारही सुरू केले होते. मात्र, तरीही तिच्या वागण्यात बदल होत नव्हता. मे महिन्यात तिने वडिलांना मारहाण करून जखमी केल्याची माहिती समोर आली आहे.
अशातच शनिवारी रात्री टीव्ही बंद करणे आणि मोबाईलच्या वापरावरून घरात वाद झाला. यावेळी रागाच्या भरात आर्याने तिच्या लहान बहिणीला मारहाण केली. त्यानंतर ती बॅट घेऊन वडिलांच्या अंगावर गेली. यावेळी रागावलेल्या पुरुषोत्तम यांनी तिच्या हातातील बॅट हिसकावून घेतली आणि तिच्याच डोक्यात मारली. यामुळे आर्या क्षणात खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर घाबरलेल्या कुटुंबीयांनी पोलिसांना तातडीने माहिती दिली नाही. रविवारी सकाळी मुलगी बेशुद्ध असल्याचा बनाव करण्यात आला. तसेच, तिच्या अंगावर पडलेले रक्ताचे डाग पुसण्यात आले. मात्र, घटनास्थळाची पाहणी आणि फॉरेन्सिक पथकाच्या तपासातून पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी आई-वडिलांची कसून चौकशी केली.
चौकशीनंतर आरोपी पित्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे मोबाईलच्या अतिवापरावरून आणि टीव्ही पाहण्यावरून झालेल्या वादात एका मुलीचा जीव गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.