

Nagpur Graduate Election : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने सुधाकर कोहळे यांना संधी दिली आहे. तर काँग्रेसने अभिजित वंजारी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, भाजपने कोहळे यांना उमेदवारी दिल्यानंतर नागपूर मतदारसंघातून भाजपच्या अनिल सोले यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला आहे.
अनिल सोले हे आज दुपारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. तर तिकडे पुणे शिक्षक मतदारसंघावरून भाजप आणि शिंदेसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
या मतदारसंघातून भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने या मतदारसंघावर दावा करत मंगेश चिवटे यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, याच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, काही ठिकाणी महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता असल्याचा प्रश्न फडणवीस यांना पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना फडणवीस यांनी "पक्षाने ज्याला उमेदवारी दिली, त्याने निवडणूक लढली पाहिजे. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी माघार घेतली पाहिजे," असं स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
ते म्हणाले, "विधानपरिषदेसाठी भाजपने ३ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. आम्हाला विश्वास आहे की या तिन्ही जागा आम्ही जिंकू. तसेच उर्वरित ठिकाणी आमचे मित्रपक्ष लढतील आणि ते देखील तेथून जिंकतील असा आम्हाला विश्वास आहे. शिवाय पक्षाने ज्याला उमेदवारी दिली आहे त्यानेच निवडणूक लढली पाहिजे.
ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी माघार घेतली पाहिजे. मात्र, तरीही कोणी बंडखोरी करणार असेल तर आम्ही नक्कीच त्यांच्याशी चर्चा करू", असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता बंडखोरीच्या तयारीत असलेल्या नेत्यांची मनधरणी करण्यात महायुतीला यश येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.