udaysinh undalkar-atul bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Dcc Bank Election : आमदार भोसलेंच्या पाठिंब्यानंतरही ॲड उंडाळकरांचा ‘सेफ गेम’; मतदारांना पाठविले अज्ञातस्थळी

Karad Political News : सातारा जिल्हा बँकेच्या कऱ्हाड सोसायटी मतदारसंघात चुरस वाढली आहे. अतुल भोसले गटाचा पाठिंबा असूनही उदयसिंह पाटील-उंडाळकरांनी मतदारांना सहलीवर पाठवले. विरोधक धनाजी पाटील-आटकेकरांनीही विजयासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

हेमंत पवार - Hemant Pawar

Karad, 26 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मतदानासाठी आठवडा राहिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप आमदार अतुल भोसले यांच्या गटाने पाठिंबा दिल्यानंतरही दगाफटका टाळण्यासाठी कऱ्हाड सोसायटीचे उमेदवार ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकरांनी त्यांच्या मतदारांना सहलीवर पाठवले, तर विरोधातील धनाजी पाटील-आटकेकरांनीही विजयासाठी फिल्डिंग लावली आहे.

ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप आमदार अतुल भोसले गटाला पाठिंबा दिला होता. त्या मोबदल्यात जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत उंडाळकर यांना पाठिंबा देण्याचे भोसले यांनी जाहीर केले होते. त्यानुसार भाजप आमदार भोसले यांनी उंडाळकर यांना पाठिंबा दिला आहे. त्यानंतरही उंडाळकर यांनी मागील निवडणुकीत पराभवाचे उट्टे काढण्यासाठी मतदारांना सहलीवर पाठविले आहे.

जिल्हा बँक निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतांची जुळवाजुळव, नाराजांची मनधरणी, मतदारांची बांधणी, संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी उमेदवारांकडून जोरदार व्यूहरचना सुरू आहे. विशेषतः कऱ्हाड, पाटण सोसायटीच्या लढतीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.

कऱ्हाड सोसायटी गटात ॲड. उंडाळकर आणि आटकेकर यांच्यातील लढत प्रतिष्ठेची आहे. मतदानासाठी दगाफटका होऊ नये, यासाठी ॲड. उंडाळकरांनी त्यांच्या मतदारांना सहलीवर पाठविले आहे, तर विरोधातील आटकेकरांनीही मतदारांशी संपर्क वाढवत फिल्डिंग लावली आहे.

दरम्यान, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या गटाची ताकद या वेळी ॲड. उंडाळकरांसोबत आहे. त्यामुळे त्यांचे पारडे सध्या जड आहे. मात्र, या गटात शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय चुरस वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ संचालक निवडीपुरती मर्यादित नसून जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावरील राजकीय वर्चस्वाची कसोटी मानली जाते. त्यामुळे प्रत्येक मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. नेत्यांच्या भेटीगाठी, उमेदवारांची रणनीती आणि मतदारांची भूमिका यावर विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT